ट्रकला धडकून दुचाकीचालक ठार
By Admin | Updated: August 30, 2016 01:17 IST2016-08-30T01:11:47+5:302016-08-30T01:17:37+5:30
औरंगाबाद : धावता ट्रक अचानक थांबल्यामुळे भरधाव दुचाकीचालक ट्रकला धडकला. या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला तरुण किरकोळ जखमी झाला.

ट्रकला धडकून दुचाकीचालक ठार
औरंगाबाद : धावता ट्रक अचानक थांबल्यामुळे भरधाव दुचाकीचालक ट्रकला धडकला. या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला तरुण किरकोळ जखमी झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री बीड बायपास रोडवरील बाळापूर शिवारातील एका हॉटेलसमोर घडली.
मोहन महादेव माळी (२४, रा. श्रीकृष्णनगर, देवळाई) असे मृत दुचाकीचालकाचे नाव आहे. तर कृष्णा शेळके (रा. जवाहर कॉलनी) हे जखमी झाले.
चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, मोहन आणि कृष्णा हे रविवारी रात्री झाल्टा शिवारातील एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. जेवण करून ते दोघेही मोटारसायकलने (क्रमांक एमएच-२० एई ८८८८) बीड बायपास रोडवरून देवळाईकडे जात होते. यावेळी त्यांच्यासमोर एक ट्रक जात होता.
वेगात असलेल्या या ट्रकचालकास रस्त्यावर मोठा खड्डा दिसला. त्यामुळे त्याने ट्रकला ब्रेक लावून ट्रक थांबवला. यावेळी मागून भरधाव येणारे दुचाकीचालक मोहन आणि कृष्णा हे दुचाकीसह ट्रकवर मागून जाऊन धडकले. या अपघाताच्या आवाजाने घटनास्थळापासून जवळ असलेल्या हॉटेलमधील लोक मदतीला धावले. रुग्णवाहिकेतून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री १ वाजेच्या सुमारास मोहनला तपासून मृत घोषित करण्यात आले. चिकलठाणा पोलिसांनी पंचनामा केला. मृत मोहनचे गारखेडा चौकातील सूतगिरणी चौकात औषधी दुकान असल्याचे त्यांनी सांगितले.