आदिवासी गावांमध्ये सामाजिक पोळा साजरा
By Admin | Updated: August 26, 2014 23:56 IST2014-08-26T23:43:27+5:302014-08-26T23:56:59+5:30
कळमनुरी : तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

आदिवासी गावांमध्ये सामाजिक पोळा साजरा
कळमनुरी : तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या खापरखेडा, तरोडा, बिबगव्हाण या गावांमध्ये पोळ्यानिमित्त गरीब शेतकऱ्यांना बैलजोड्यांसाठी साजश्रृंगाराचे वाटप करून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
पोळ्याच्या सणाला कृषी संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची मनोभावे पूजा करून त्याची सेवा करण्याचा हा दिवस असतो. परंतू यंदा दुष्काळी स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. मागील वर्षी झालेल्या गारपिटीच्या तडाख्यातून सावरत असतानाच शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुबार-तिबार पेरणी करूनही पिके येण्याची आशा मावळल्याने आधीच कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा पोळा सण साजरा करता येईल की नाही अशी स्थिती होती. ही बाब ध्यानात घेऊन कळमनुरी तालुक्यातील खापरखेडा, तरोडा, बिबगव्हाण या गावांमधील आदिवासी शेतकऱ्यांना सणासाठी मदत करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालेले घोळवा येथील अजित मगर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.
तरोडा येथे शेतकऱ्यांना बैलजोडी सजविण्यासाठी लागणाऱ्या झुली, बेगड व इतर श्रृंगाराचे साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अजित मगर, बळीराम नाईक, भावराव सरकुंडे, संतोष वाळले, नारायण माहोरे, देवीदास खंदारे, नीळकंठ मस्के, भीकाराव चवरे, मधुकर खंदारे, दीपक ठाकरे, भिकाजी माहोरे, संभाजी खंदारे, शामराव ससाने, भीमराव मस्के, राहुल चवरे आदी उपस्थित होते. खापरखेडा येथेही हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी बालाजी चिभडे, हरिदास असोले, देवजी आसोले हजर होते. बिबगव्हाण येथील शिवाजी फोपसे, बालासाहेब नाईक, सदाशिव बोरकर,बालासाहेब पोले, किशन मापारे, गंगाधर वंजारे, रघुनाथ सोवितकर, अशोक जावळे, दामाजी फोपसे, बाबाराव सातपुते, केशवराव बोडखे, सरपंच दत्तराव बेले, साहेबराव पोटफाडे, रामजी गुहाडे, उत्तम खरवडे, उत्तम पोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)