उच्चशिक्षितांचा कल आता शेळीपालनाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST2021-07-22T04:04:22+5:302021-07-22T04:04:22+5:30
-- औरंगाबाद : नोकरीतील अनिश्चितता, कोरोनाची महामारी व त्यातून ओढावलेल्या आर्थिक संकटाने उच्चशिक्षितांचा कल आता शेतीपूरक जोडव्यवसायांकडे वाढला असल्याचे ...

उच्चशिक्षितांचा कल आता शेळीपालनाकडे
--
औरंगाबाद : नोकरीतील अनिश्चितता, कोरोनाची महामारी व त्यातून ओढावलेल्या आर्थिक संकटाने उच्चशिक्षितांचा कल आता शेतीपूरक जोडव्यवसायांकडे वाढला असल्याचे दिसून येत आहे. पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात एरव्ही केवळ शेतकरीच प्रशिक्षणासाठी मागणी करत होते. मात्र, आतापर्यंत १५ हून अधिक अभियंत्यांसह उच्चशिक्षित, पदवीधर, पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी कुक्कुटपालन, शेळीपालनाच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत (परभणी) कार्यरत पैठण रोड येथील कृषी विज्ञान केंद्रातमार्फत शेतीपूरक जोडधंद्यांसह विविध अभ्यासक्रमांचे मागणीनुसार प्रशिक्षण देते. गेल्या वर्षापर्यंत शेतकरी किंवा बचत गट, तरुणांचा समूह, गटशेतीचे सदस्यच अशा प्रशिक्षणासंबंधी विचारपूस करत होते. मात्र, अलीकडे कोरोनामुळे सर्व परिस्थिती बदललेली असून खात्रीचे उत्पन्न देऊ शकेल, कमी जोखिमेत करता येणाऱ्या जोड व्यवसायासंदर्भात युवकांकडून चाचपणी केली जात आहे. त्यात प्रामुख्याने शेळीपालन, कुक्कुटपालनासाठी १५ उच्चशिक्षितांनी नोंदणी करून प्रशिक्षणाची मागणी केली आहे. त्यावर लवकरच ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे, असे कृषी विज्ञान केंद्रातील विषयतज्ज्ञ डाॅ. अनिता जिंतूरकर यांनी सांगितले.