झाडे तोडली; लावली नाहीत
By Admin | Updated: July 27, 2014 01:10 IST2014-07-26T23:46:36+5:302014-07-27T01:10:12+5:30
परभणी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी या मार्गावरील झाडे तोडण्यात आली खरी़ परंतु,तोडलेल्या झाडांच्या प्रमाणात अद्यापही झाडे लावली नाहीत़
झाडे तोडली; लावली नाहीत
परभणी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी या मार्गावरील झाडे तोडण्यात आली खरी़ परंतु, जिल्हाधिकारी तथा तत्कालीन आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार तोडलेल्या झाडांच्या प्रमाणात अद्यापही झाडे लावली नाहीत़ त्यामुळे या सूचना डावलल्याची भावना निर्माण होत आहे़
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ परभणी शहरातून जातो़ या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याने महामार्गावर शहरामध्ये असलेली झाडे तोडण्याची परवानगी राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मागितली होती़ ही परवानगी देताना सुरुवातीला मनपाने नकार दिला होता़ जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह हे महानगरपालिकेचे आयुक्त असताना राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती़ शहराची वाढती लोकसंख्या, राष्ट्रीय महामार्गावर वाढलेली रहदारी आणि रुंदीकरणाची गरज लक्षात घेऊन ही झाडे तोडण्याची परवानगी आयुक्त तथा जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी त्यावेळी दिली होती़ परंतु, ही परवानगी देताना एक अटही घातली होती़ त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गावरील एक झाड तोडले तर त्याऐवजी चार झाडे लावावीत, अशी सूचना केली होती़ विशेष म्हणजे तशा प्रकारचा ठरावही झाला होता़ परंतु, झाडे तोडण्याची परवानगी मिळाल्यानंतर संबंधित विभागाने या मार्गावरील झाडे तोडली़ दीड महिन्यांपूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा ते खानापूर फाटा या मार्गावरील दोन्ही बाजूंची झाडे तोडण्यात आली़ सध्या पावसाळा लागलेला आहे़ परंतु, अद्यापपर्यंत या महामार्गावर एकाही झाडाचे वृक्षारोपण केलेले नाही़ त्यामुळे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीने घेतलेल्या ठरावाचा विसर संबंधित विभागाला पडल्याचे दिसत आहे़ दरम्यान, या प्रश्नावर महानगरपालिकेने कठोर भूमिका घेऊन संबंधित विभागाकडून झाडे लावून घ्यावीत, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)
वृक्षसंवर्धन समितीचा ठराव
परभणी शहरातील झाडांच्या संगोपनासंदर्भात महानगरपालिकेमध्ये वृक्ष संवर्धन समिती कार्यरत आहे़ आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असतात़ तर पाच स्वीकृत नगरसेवक समितीचे सदस्य आहेत़ त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धना संदर्भात काम करणारे इतर पाच पदाधिकारीही समितीवर सदस्य आहेत़ या समितीने वसमत रस्त्यावरील झाडे तोडण्यासंदर्भात परवानगी देताना एक झाड तोडल्यास चार झाडे लावावीत, असा ठराव घेतला होता़ त्यानुसारच ही परवानगी देण्यात आली होती़ परंतु, अद्यापपर्यंत झाडे लावली गेली नाहीत़
विजेचे खांबही काढणार
या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये वीज खांबांचाही अडथळा आहे़ हे विजेचे खांबही काढून बाजूला केले जाणार आहेत़ परंतु, अद्यापपर्यंत महावितरण कंपनीने हे काम हाती घेतले नाही़
रस्त्याच्या दुतर्फा होती ७५ झाडे
परभणी-वसमत रस्त्यावर शहरातील श्री शिवाजी महाराजांचा पुतळा ते खानापूर फाटा या अंतरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला तब्बल ७५ झाडे होती़ राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने ही सर्व झाडे तोडली आहेत़ महानगरपालिकेने दिलेल्या परवानगीनुसार एक झाड तोडले तर चार झाडे लावणे बंधनकारक आहे़ त्यामुळे या विभागाला सदर रस्त्यावर दोन्ही बाजूला ३०० झाडांची लागवड करावी लागणार आहे़