वृक्षलागवड? छे, फक्त प्रसिद्धीसाठी
By Admin | Updated: July 5, 2017 00:19 IST2017-07-05T00:16:11+5:302017-07-05T00:19:59+5:30
धर्माबाद : रोपटे लावताना फक्त काढण्यापुरता व तो फोटो व्हॉटस्अप, फेसबुकवर पाठवून सोशल मीडियात चमकोगिरी करण्यापुरतेच हे अभियान दिसत

वृक्षलागवड? छे, फक्त प्रसिद्धीसाठी
लक्ष्मण तुरेराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धर्माबाद : तालुक्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये वृक्ष लागवडीस १ जुलैपासून सुरूवात झाली. वृक्ष लागवड करताना लोकप्रतिनिधी, अधिकारी सहभागी झाले. परंतु रोपटे लावताना फक्त काढण्यापुरता व तो फोटो व्हॉटस्अप, फेसबुकवर पाठवून सोशल मीडियात चमकोगिरी करण्यापुरतेच हे अभियान दिसत असून रोपटे लावल्यानंतर त्याच्या संवर्धनाचे काय? असा सवाल आहे. वृक्ष लागवडीनंतर काही दिवसांतच ही रोपटी नष्ट होतात, असा धर्माबाद तालुक्याचा अनुभव आहे.
गेल्यावर्षी लावलेली किती झाडे आजघडीला जगली? याचा जर ताळमेळ काढला तर शासनाच्या आदेशाची औपचारीकता पूर्ण करण्यापुरतेच अभियान निव्वळ कागदावर आहे. गतवर्षीही शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड अभियान राबविले.
प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयासाठी उद्दिष्टही देण्यात आले. त्यावर लाखो रूपयांचा खर्चही करण्यात आला. परंतु लागवड केल्यानंतर त्या लावलेल्या रोपट्यांचे काय झाले? हे कुणालाच माहीत नाही. केवळ लागवड करून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी आपले हात झटकले. त्यामुळे संवर्धनाअभावी गतवर्षी लावलेले अनेक रोपटे नष्ट झाल्याचे चित्र तालुक्यात आहे.
राज्य सरकारने १ ते ७ जुलैपर्यंत ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुसार वृक्षलागवड करण्यात येत आहे. पण अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी, अधिकारी एखादे झाड लावून फोटो काढण्याचा व त्यानंतर तोच फोटो सोशल मीडियात व वर्तमानपत्रात टाकून "चमकोगिरी" करत आहेत. शासनाच्या उद्दिष्टाला केवळ औपचारिकता पूर्ण करून हरताळ फासण्याचे काम लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून होत आहे, अशा स्थितीत मात्र १ ते ७ जुलैपर्यंत लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडांची पाहणी ही प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहिजे.
दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती वृक्ष लावण्यात आलेत? वृक्ष योग्यरीत्या लावण्यात आले की नाही? दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता झाली की नाही?, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी व या कामात हलगर्जीपणा व चमकोगिरी करणाऱ्यांवर कार्यवाही करावी. तेव्हाच वृक्षलागवड कार्यक्रम हा यशस्वी होईल; अन्यथा योजनेचा बोजवारा होईल हे मात्र निश्चित़