बजाजनगरात वृक्षारोपण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:27+5:302020-12-17T04:31:27+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे ...

बजाजनगरात वृक्षारोपण कार्यक्रम
वाळूज महानगर : बजाजनगरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संजना महाडिक, तसेच अमोल ताठे, शंकर गावंडे, प्रशांत ताठे आदींची उपस्थिती होती.
आलमगीर सोसायटीत सुविधांची वानवा
वाळूज महानगर : साजापूर येथील आलमगीर सोसायटीत सुविधांची वानवा असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सोसायटीत स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा पुरविण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन कानाडोळा करीत असल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. सुविधा मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे सतत पाठपुरावा करूनही प्रशासन केवळ आश्वासन देऊन बोळवण करीत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
बकवालनगरात समाजप्रबोधन कार्यक्रम
वाळूज महानगर : नायगाव- बकवालनगर येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात ह.भ.प. निवृत्ती महाराजांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधन करीत उपस्थितांना खिळवून ठेवले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक आशू शेख, पपीन माने, डॉ. ज्ञानेश्वर नीळ आदींनी परिश्रम घेतले.
दत्त कॉलनीतील रस्ते उखडले
वाळूज महानगर : वाळूजच्या दत्त कॉलनीत रस्ते उखडल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीतील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत असून खडी व दगड निखळत आहेत. परिणामी ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वार व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
कंपनीच्या बसमधून प्रवासी वाहतूक
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत कामगारांची ने-आण करणाऱ्या खाजगी बसमधून प्रवाशांचीही वाहतूक केली जात असल्यामुळे एसटी महामंडळाचे नुकसान होत आहे. बहुतांश खाजगी बसचे चालक कामगारांना कंपनीत सोडल्यानंतर ठिकठिकाणी बस उभी करून प्रवासी पळवीत असतात. विशेष म्हणजे एसटी बस, काळी-पिवळी व अॅपेरिक्षा यांच्यापेक्षा कमी भाडे खाजगी बसचालक घेत असल्यामुळे अनेक प्रवासी खाजगी बसमधून प्रवास करीत असल्याचे चित्र उद्योगनगरीत पाहावयास मिळते.
सिडको-तीसगाव रस्त्याची दुरवस्था
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर ते तीसगाव या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. बजाजनगर, वडगाव, सिडको परिसर आदी भागातील कामगार व नागरिक या रस्त्याचा वापर करीत असतात. शहरात ये-जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची कायम वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना पंढरपूर किंवा ए.एस. क्लबमार्गे वळसा घालून जावे लागत आहे.