वृक्ष लागवडीची तपासणी होणार
By Admin | Updated: September 5, 2014 00:14 IST2014-09-04T23:47:59+5:302014-09-05T00:14:01+5:30
अभिमन्यू कांबळे, परभणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची तपासणी केली जाणार आहे़

वृक्ष लागवडीची तपासणी होणार
अभिमन्यू कांबळे, परभणी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची तपासणी केली जाणार असून, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना नियुक्त केले जाणार आहे़
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता़ ही वृक्ष लागवड रस्त्याच्या दुतर्फा, गट लागवड, पडिक शेत जमीन लागवड, शाळेच्या किंवा सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या परिसरात करण्यात आली होती़ यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता़ या मोहिमेंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण करताना वृक्षसंगोपन या बाबीकडेही लक्ष देणे आवश्यक असते़ यासाठी रोगांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी काही कुटूंबियांवर सोपविण्यात आली होती़ गेल्या तीन वर्षात वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर सद्यस्थितीमध्ये किती झाडे जीवंत आहेत याचा आढावा घेण्याचे आदेश राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत़ यासाठी २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवावी़ यासाठी माध्यमिक शाळांमधील शिक्षक व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि हरित संरक्षण गटांमध्ये समाविष्ठ असलेल्या व्यक्तींकडून या रोपांची तपासणी करावी, असेही या संदर्भातील आदेशात म्हटले आहे़ या मोहिमेत ज्या ठिकाणी रोपे जीवंत नाहीत त्या ठिकाणी पुनर लागवड करण्याच्या दृष्टीकोनातून सुधारात्मक कृती करणे अपेक्षित असल्याचे आदेशात म्हटले आहे़
सहा सदस्यांची समिती
या विशेष तपासणी मोहिमेसाठी जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची नियुक्त करण्यात आली असून, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक या समितीचे सचिव राहणार आहेत़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामंपचायत) तसेच मग्रारोहयोचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक, रोहयो उपजिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी हे या समितीचे सदस्य राहणार आहेत़
शिक्षक, विद्यार्थ्यांना मानधन
या विशेष तपासणी मोहीमेत काम करणाऱ्या शिक्षकांना एका ग्रामपंचायतीच्या एका कामसाठी २०० रुपये, दोन कामांसाठी ३०० रुपये आणि तीन पेक्षा जास्त कामांसाठी ४०० रुपये मानधन दिले जाणार आहे़ तर विद्यार्थ्यांना एका कामासाठी १०० रुपये, दोन कामांसाठी १५० रुपये आणि तीनपेक्षा अधिक कामांसाठी २०० रुपये मानधन दिले जाणार आहे़
परभणीत ८ रोजी होणार बैठक
संपूर्ण राज्यभरात या मोहिमेचे काम सुरू झाले असले तरी परभणी जिल्हा परिषदेत मात्र अद्यापही तपासणीचे काम सुरू नाही़ या संदर्भात जि़ प़ तील पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी करडखेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर ८ सप्टेंबर रोजी संबंधितांची बैठक बोलावली असल्याचे सांगितले़ ८ रोजी बैठक झाल्यानंतर पुढच्या आठ दिवसांमध्ये तपासणी मोहीम होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे़ कारण या बाबतची तपासणी जिल्ह्यातील ७०४ ग्रा़पं़मध्ये करायची आहे़ विशेष म्हणजे जि़ प़ कडे तीन वर्षात केलेल्या वृक्षारोपणाची माहितीच सध्या उपलब्ध नाही़