कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांवर सतरंजीवर उपचार
By Admin | Updated: May 26, 2015 00:47 IST2015-05-26T00:19:33+5:302015-05-26T00:47:31+5:30
वाशी : येथील ग्रामीण रूग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी सकाळी ९० महिलांवर बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली

कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांवर सतरंजीवर उपचार
वाशी : येथील ग्रामीण रूग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी सकाळी ९० महिलांवर बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या खाटांमुळे या महिलांना फरशीवर सतरंज्या टाकून उपचार करण्यात आले़ तर त्यांच्या लहान बालकांना चक्क झाडाच्या फांद्यांना झोळ्या बांधून झोपविण्याची वेळ रूग्णांसह नातेवाईकांवर आली़ आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर महिला रूग्णांची मात्र, मोठी गैरसोय झाल्याने संताप व्यक्त होत आहे़
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि ग्रामीण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे शिबीर येथील ग्रामीण रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते़ या शिबीरामध्ये तालुक्यातील ९० लाभार्थी महिलांना सहभाग नोंदवला होता. गेल्या अनेक महिन्यापासून बिनटाका शस्त्रक्रिया करण्यासाठी लाभार्थी महिला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात होत्या़ मात्र, आरोग्य विभागाने शस्त्रक्रिया करण्यास दिरंगाई केली होती.
दिरंगाई झाल्यामुळे सोमवारी आयोजित शिबिरात सर्वच ९० महिला सहभागी झाल्या़ या शस्त्रक्रियेसाठी रविवारी रात्रीपासून या महिलांसह नातेवाईकांची रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती़ प्रयोगशाळेतील तपासण्या करून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल देण्यात आला होता़ त्यानंतर बीड येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. राहूल यंदे यांनी सोमवारी पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडल्या. शस्त्रक्रियेनंतर मात्र, ग्रामीण रूग्णालयात खाटांची संख्या अपुरी असल्याने या महिलांना चक्क फरशीवर सतरंजी टाकून उपचार करण्यात आले़ झाडांना झोळ्या बांधून बालकांना झोपविण्यात आले़ या गैरसोयीमुळे महिलांसह नातेवाईकांनी मात्र, तीव्र संताप व्यक्त केला़ (वार्ताहर)