अपुऱ्या कर्मचाऱ्यांकडून ‘लालपरी’ वर उपचार

By Admin | Updated: May 20, 2015 00:20 IST2015-05-19T23:57:14+5:302015-05-20T00:20:15+5:30

बीड : यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या ४० टक्के जागा रिक्त असल्याने लालपरीवर उपचार (दुरूस्ती) करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत.

Treatment on 'red' by insufficient employees | अपुऱ्या कर्मचाऱ्यांकडून ‘लालपरी’ वर उपचार

अपुऱ्या कर्मचाऱ्यांकडून ‘लालपरी’ वर उपचार


बीड : यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या ४० टक्के जागा रिक्त असल्याने लालपरीवर उपचार (दुरूस्ती) करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची लालपरी (बस) नेहमीच आजारी पडताना दिसून येते.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत असते. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी ती कार्यरत असते. मात्र मागील काही दिवसांपासून महामंडळाच्या सेवेमध्ये कमतरता दिसून येत असून, सुरक्षितता धोक्यात आल्याचे दिसते.
बीड विभागीय कार्यालयांतर्गत जिल्ह्यात ५०० बसगाड्या धावतात. त्यांच्या दुरूस्तीसाठी मात्र अपुरे कर्मचारी आहेत. यांत्रिक विभागातील ४० टक्के जागा आजही रिक्त असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. अनेक वेळा बसगाड्या दुरूस्त करण्यास वेळ लागत असून, दुरूस्ती व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येते.
नियम काय सांगतो ?
बस आगारात आल्यानंतर तिच्या दुरूस्तीसाठी एक कर्मचारी नेमलेला असतो. एक नियत (फेरी) एक कर्मचारी या प्रमाणे यांत्रिक विभागाचे नियोजन असते. मात्र, बस जादा अन् कर्मचारी अपुरे अशी परिस्थिती असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांना जादा वेळ काम करून आलेल्या बसगाड्यांची दुरूस्ती करावी लागत आहे.
आगारांमध्येही अपुरी संख्या
जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये यांत्रिक कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. बीड आगारात केवळ ६० कर्मचारी कार्यरत असून ८८ बसगाड्यांची दुरूस्ती आहे. इतर आगारांचीही हीच परिस्थिती असून याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. जागा भरण्याची मागणी होत आहे.
बसगाड्याही अपुऱ्याच
सध्या जिल्ह्यात धावत असलेल्या बसगाड्यांची संख्या प्रवाशांची संख्या पाहता खूपच कमी आहे. जिल्ह्यात सध्या ५०० बसगाड्या धावत असून आणखी ४०० गाड्यांची आवश्यकता असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत यांत्रिक अभियंता के. एस. लांडगे म्हणाले, विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे हे मान्य आहे. परंतु आमचे योग्य नियोजन आहे. आगारातील रिक्त जागांबाबत विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना विचारावे. (प्रतिनिधी)

Web Title: Treatment on 'red' by insufficient employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.