परवानगी नसतानाही कोरोना रुग्णांवर उपचार; रुग्णालयावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:05 IST2021-04-04T04:05:07+5:302021-04-04T04:05:07+5:30
वैजापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता नसतानादेखील बेकायदेशीररीत्या वैजापुरात काही खासगी रुग्णालयांत पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा ...

परवानगी नसतानाही कोरोना रुग्णांवर उपचार; रुग्णालयावर कारवाई
वैजापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता नसतानादेखील बेकायदेशीररीत्या वैजापुरात काही खासगी रुग्णालयांत पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अशा रुग्णालयावर तहसीलदार राहुल गायकवाड यांनी शनिवारी सायंकाळी पाहणी करून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला योग्य उत्तरे न मिळाल्यास या रुग्णालयावर कडक कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत.
लाडगाव रस्त्यावरील देवगिरी हाॅस्पिटलची तहसीलदार गायकवाड यांनी अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान कोरोनासदृश दोन रुग्ण आढळून आले. दरम्यान रुग्णालयाचे डाॅ. अग्रवाल यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. या कायद्यान्वये रुग्णाच्या असहायतेचा गैरफायदा घेणे गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत शहरातील काही खासगी रुग्णालयाकडून कोविडच्या नावाखाली रुग्णांची लूट केली जात आहे. शासकीय परवानगी नसतानादेखील काही रुग्णालयांतील डॉक्टर रुग्णांची दिशाभूल करीत आहेत. यासंदर्भात काही नागरिकांकडून प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. वैद्यकीय अधिकारी चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करीत होते. मात्र, तहसीलदारांनी शनिवारी अचानक कारवाई करून रुग्णालय तपासणी केल्याने खाजगी रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत.