प्रवाशांना छळणाऱ्या ट्रॅव्हल्सची झाडाझडती

By Admin | Updated: November 4, 2014 01:40 IST2014-11-04T01:25:15+5:302014-11-04T01:40:08+5:30

औरंगाबाद : खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करीत असताना आग लागल्यास ती विझविण्यासाठी अनेक गाड्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा नसते.

Traveler's Traveling Pilgrims | प्रवाशांना छळणाऱ्या ट्रॅव्हल्सची झाडाझडती

प्रवाशांना छळणाऱ्या ट्रॅव्हल्सची झाडाझडती


औरंगाबाद : खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करीत असताना आग लागल्यास ती विझविण्यासाठी अनेक गाड्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा नसते. शिवाय अनेक ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये आपत्कालीन दरवाजा नाही. यासह अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सविरुद्ध राज्यभर मोहीम सुरू आहे. भरारी पथकांनी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करावी, असे आदेश सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाणे यांनी दिले. कारवाईदरम्यान प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
शहरातून अनेक ट्रॅव्हल्स बसेस प्रवाशांची वाहतूक करतात. याशिवाय शहराबाहेरील अनेक ट्रॅव्हल्स गाड्या येत असतात. अनेक गाड्यांमध्ये आपत्कालीन दरवाजा नसतो, तर अनेक बसमध्ये हा दरवाजा कोठे आहे, त्याचा वापर कसा करावा, याची माहिती प्रवाशांना दिली जात नाही. त्यामुळे अपघाताच्या वेळी जीवित हानी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भरारी पथकाकडून स्लीपर कोच, सिटर अशा ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी केली जाणार आहे.
यामध्ये गाड्यांच्या कागदपत्रांबरोबर आपत्कालीन खिडकीच्या बाबीकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे.
ब्रेकेबल काच
अनेक बसेसमध्ये आपत्कालीन दरवाजाऐवजी ब्रेकेबल काच असते. आपत्कालीन परिस्थितीत ही काच फोडण्यासाठी हातोडी असते; परंतु ही हातोडी कोणत्या ठिकाणी आहे, याची माहिती प्रवाशांना देण्याकडे दुर्लक्ष केले जाते.१
दिवाळीनिमित्त विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गेल्या काही दिवसांत खाजगी बसेसला मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे प्रवाशांची गर्दी असलेल्या कालावधीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत बस ओनर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला म्हणाले की, टॅव्हल्स गाड्यांची तपासणी करणे हे स्वागतार्ह आहे; परंतु तपासणीमुळे प्रवाशांना त्रास होता कामा नये. प्रवाशांना वेठीस धरता कामा नये. दिवसभर गाड्या उभ्या असतात. ट्रॅव्हल्सचालकांना बोलावून गाड्यांमध्ये जे बदल आवश्यक आहेत त्याबाबत सूचना करता येतील.

Web Title: Traveler's Traveling Pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.