विनातिकीट प्रवास पडला कैकपट महागात
By Admin | Updated: August 30, 2014 00:17 IST2014-08-30T00:06:36+5:302014-08-30T00:17:36+5:30
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील वाढत्या विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अचानक तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे.

विनातिकीट प्रवास पडला कैकपट महागात
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील वाढत्या विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अचानक तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर गुरुवारी अशा प्रकारे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे गुरुवारी अनेकांना विनातिकिटाचा प्रवास चांगलाच महाग पडला.
रेल्वेस्थानकावर दिवसभर ही मोहीम राबविली गेली. दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक चार्लस हेरेंज, २० तिकीट तपासणीस आणि आरपीएफ जवानांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध रेल्वेंमध्ये आणि स्थानकावर प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली. यात २२० प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून जवळपास ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अधिकाऱ्यांकडून विविध रेल्वेस्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
तिकीट काढून प्रवास करावा
प्रवाशांनी रेल्वेच्या पर्यायाने देशाच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे. यासाठी विनातिकीट प्रवास करणे टाळले पाहिजे. प्रत्येकाने तिकीट काढूनच रेल्वे प्रवास केला पाहिजे, असे दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक चार्लस हेरेंज म्हणाले.
प्रवासी संख्या कमी
रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण हे अधिक असल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने वेळोवेळी तपासणी मोहीम हाती घेण्यात येते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गेल्या काही महिन्यांत रेल्वेच्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईदरम्यानही विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळून येण्याचे प्रमाण सध्या कमी आहे.