पोलेंचा प्रवास काश्मीर टू लातूर
By Admin | Updated: August 3, 2014 01:15 IST2014-08-03T00:11:05+5:302014-08-03T01:15:52+5:30
लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग पोले शनिवारी रूजू झाले.

पोलेंचा प्रवास काश्मीर टू लातूर
.लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग पोले शनिवारी रूजू झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सायंकाळी शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारला. अंश सेल्सिअस ऐकूनच थंडी भरणाऱ्या जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातून करिअरची सुरुवात केलेले पोले आता लातूरच्या दुष्काळी मैदानात जिल्हाधिकारी म्हणून उतरले आहेत.
पांडुरंग पोले हे २००४ च्या बॅचचे जम्मू काश्मीर केडरचे अधिकारी आहेत. त्यांचा पहिला पदभार पूंछ जिल्ह्यातील मेढा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून होता. त्यानंतर मुंबईच्या अन्न व औषध विभागात उपसचिव म्हणून काम केल्यानंतर ते आता लातूरसारख्या जिल्ह्यात दुष्काळाचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी रूजू झाले. पदभार घेतल्यानंतर त्यांनी लातूरबाबत आपल्या गावात आल्याची भावना व्यक्त केली. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील असल्याने पोले यांचा लातूरशी संबंध आलेला. लातूरचा इतिहास चांगला आहे. इथल्या कामाची दखल राज्यभरात घेतली जाते. त्यामुळे कामाचा लातूर पॅटर्न कायम राखण्याचा आपला प्रयत्न राहील, असे पोले म्हणाले. आपण ग्रामीण भागातील असल्याने सर्वसामान्यांच्या समस्यांची आपल्यास जाण आहे. त्यामुळे भेटण्यास येणाऱ्या प्रत्येकाची समस्या ऐकून निवारण करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही पोले यांनी सांगितले. दरम्यान, १५ आॅगस्टच्या कालावधीत कधीही निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेचच निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. हे काम समोर असले तरी जिल्ह्यात पाऊस झाला नसल्याने पाणीप्रश्न भेडसावणार आहे. त्याअनुषंगाने शक्य तितके अधिक प्रयत्न टंचाई निवारणासाठी आपण करू, अशी ग्वाहीही जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली. (प्रतिनिधी)
लातूरकरांनी प्रेम दिले : विपीन शर्माजिल्हाधिकारी म्हणून माझी पहिलीच पोस्टिंग लातूरला होती. येथील अनुभव अत्यंत चांगला राहिला. लातूरकरांनी भरभरून प्रेम दिले. मी कामास न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाधानी आहे. ई-गव्हर्नन्समध्ये लातूरला राज्यात आघाडीवर नेले आहे. येथील सर्व सहकारी कर्मचारी, नागरिक, लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्यामुळे चांगले काम होऊ शकले, अशी भावना मावळते जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केली.