५३०० किलोमीटरचा प्रवास ९६ दिवसात

By Admin | Updated: February 16, 2015 00:51 IST2015-02-16T00:47:50+5:302015-02-16T00:51:32+5:30

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म समजल्या जाणाऱ्या आग्रा मोहिमेत औरंगजेबाच्या हातावर तुरी देवून महाराजांनी आपली सुटका करून घेतली़

Travel 5300 kilometers in 96 days | ५३०० किलोमीटरचा प्रवास ९६ दिवसात

५३०० किलोमीटरचा प्रवास ९६ दिवसात


उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म समजल्या जाणाऱ्या आग्रा मोहिमेत औरंगजेबाच्या हातावर तुरी देवून महाराजांनी आपली सुटका करून घेतली़ आग्रा येथून राजगडावर परतताना तब्बल ५३०० किलोमीटरचा प्रवास ९६ दिवसांत पूर्ण केल्याची माहिती प्रमोद मांडे यांनी दिली़ महाराजांच्या मोहिमेला जाणाऱ्या व महाराजांनी सुटका करून घेत राजगडावर येईपर्यंतच्या मार्गाची माहिती मांडे यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे उपस्थितांना दिली़
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने शिवसप्ताहनिमित्त येथील लेडिज क्लबच्या मैदानावर रविवारी आयोजित कार्यक्रमात मांडे यांनी आग्रा मोहिमेच्या रस्त्यांची डिजिटल स्क्रीनद्वारे सचित्र माहिती दिली़ प्रारंभी शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने प्रमोद मांडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला़ मांडे म्हणाले, मिर्झा राजेंशी तह झाल्यानंतर शिवाजी महाराज राजगडावरून आग्रा मोहिमेवर निघाले होते़ शहाजानचा मुलगा औरंगजेब हा अत्यंत धूर्त राजकारणी होता़ शहाजान यांनी गादीवर येण्याचा मोह मुलांना होवू नये म्हणून औरंगजेबासह आपली चारही मुले चारही दिशेला पाठवून दिली होती़ शहाजन आजारी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर औरंगजेबासह त्याचे चारही भाऊ सैन्य घेवून आग्राकडे निघाले़ यादरम्यान त्याने मुराद या भावाला पकडून ग्वाल्हेरच्या तुरूंगात टाकले, दारा नावाच्या भावाला पकडून त्याच्याविरूध्द आयोग बसवून त्याला कायदेशीररित्या पकडले़ तसेच नजरबेग याच्यामार्फत त्याला मारून टाकले़ नजरबेगलाही मुकबुल या सेनापतीकडून भर दरबारात मारून टाकण्याचा डाव खेळला़ या कृत्यामुळे मकबुललाही मारले़ वडिल शहाजान व बहिणीला तुरूंगात टाकून पाण्यासाठीही तरसाविले़ एकूणच सत्ता मिळविण्यासाठी औरंगजेबाने वडिलांपासून भाऊ, बहिणीलाही सोडले नाही़ अशा या औरंगजेबाची वाढदिवसादिनी शिवाजी महाराजांची त्याची भेट झाली़ त्यावेळच्या नाट्यमय घडामोडीचा इतिहास त्यांनी सांगितला़ तेथून महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले़ दोन महिने महाराज व औरंगजेब यांनी एकमेकाविरूध्द विविध डाव रचले होते़ महाराजांनी औरंगजेबाचे सर्व डाव उधळून लावत नजरकैदेतून संभाजी महाराजांना घेवून बाहेर पडले़ महाराज आग्रा येथून बाहेर पडताच औरंगजेबाने चारही दिशांना दवंडी दिली़ तेथून मथुरेकडे पूर्वेकडे ते गेले़ कनोजमध्ये महाराजांना काही लहान मुलांनी ओळखले होते़ तेथून पुढे बनारसमध्ये त्यांनी संगमावर विधीवत पूजा केली होती़ त्याचा उल्लेख दस्तऐवजात आढळल्याचेही मांडे यांनी सांगितले़ पुजेदरम्यान महाराजांनी भटजींना हिरा दिला होता़ तो हिरा विकून भटजी रंकाचा राजा झाल्याचेही ते म्हणाले़ तेथून अंबिकापूर, विलासपूर, चुनळगड, जवळपास ५०० किलोमीटरचे घनदाट बस्तरचे जंगल पार करून महाराज पंढरपूरजवळ आले़ तेथून ते राजगडावर सुखरूप पोहोचल्याची माहिती मांडे यांनी दिली़
या प्रवासाच्याही इतिहासावरून वाद निर्माण झाले होते़ मात्र, त्यानंतरच्या काळात सापडलेल्या काही पुराव्यानंतर आग्राहून राजगडाला येण्याचे अंतर हे जवळपास ६३०० किलोमीटर अंतराचे असल्याचे समोर आले असून, हे अंतर पार करावयास लागलेला कालावधी ९६ दिवसांचा असल्याचेही मांडे यांनी सचित्र माहिती देताना सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Travel 5300 kilometers in 96 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.