झाल्ट्यात दरोडा
By Admin | Updated: March 14, 2016 00:57 IST2016-03-14T00:50:45+5:302016-03-14T00:57:22+5:30
औरंगाबाद : दरोडेखोरांनी दोन घरांवर हल्ला चढवला. कुलूप तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत झाल्टा येथे रविवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास धुमाकूळ घातला.

झाल्ट्यात दरोडा
औरंगाबाद : कुटुंबीय गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी दोन घरांवर हल्ला चढवला. कुलूप तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत झाल्टा येथे रविवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास धुमाकूळ घातला. यात चौघे जखमी असून दोन जण गंभीर आहेत. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूआहेत. रेखा दीपक शिंदे, वाळोबा दळवी अशी गंभीर जखमींची नावे आहेत. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, दीपक शेषराव शिंदे (रा. झाल्टा) यांच्या बंगल्यात तीन दरोडेखोरांनी पहाटे ३ च्या सुमारास दरोडा घातला. शिंदे कुटुंबीय झोपेत असतानाच घराचा कडीकोंडा तोडून ते बंगल्यात घुसले. दीपक यांच्या पत्नी रेखा यांच्या खोलीत शिरून त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यांचे वडील व अन्य नातेवाईकांना धमकावून दरोडेखोरांनी कपाटे उचकटली. आतून सोन्याची एकदाणी, अंगठ्या पोत, मोबाईल, अशा वस्तू लंपास केल्या.
शिंदे यांच्या घरी धुमाकूळ घातल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा गजानन नंदू सुरासे यांच्या घराकडे वळवला. त्यांच्या घरावर चालून गेलेल्या दरोडेखोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. येथेही दरोडेखोरांनी कुटुंबियांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून ६७ हजार रुपयांचा ऐवज लुटला. चोरीचा प्रकार सुरू असतानाच सागर सुरासे यांना जाग आली. त्यांची दरोडेखोरांसोबत झटापट झाली. दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. दरोड्याचा हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी एकाला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु दरोडेखोरांनी बाळू सुरासेंच्या डोक्यात वार केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
ही घटना माहिती झाल्यावर पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, पोलीस निरीक्षक कांचनकुमार चाटे, सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, महेश आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
४ श्वानपथकाने जवळच असलेल्या टाकळी शिवारातील पारधी वस्तीपर्यंत माग काढला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. मात्र त्यातून काहीही पुढे आले नाही.
पथके रवाना
या घटनेनंतर पोलिसांची दोन पथके जालना आणि इतर भागात रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांनी दिली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू केली असून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक कसून तपास करीत आहेत.
बचत गटाचे पैसे गेले
नंदू सुरासे यांच्या घरात त्यांना बचत गटाचे मिळालेले पैसे ठेवण्यात आले होते. ते दरोडेखोरांनी लुटले. तसेच दीपक शिंदे याच्या घरात भाचीच्या लग्नासाठी काही दागिने व रक्कम होती. दरोडेखोरांनी दागिने लुटले; सुदैवाने रक्कम वाचली. घटना घडल्यावर नंदू सुरासे यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. प्रिया थोरात करीत आहेत.