वाहतुक पोलिसांची ‘हिरोगिरी’ वाहनाधारकांच्या मुळावर
By Admin | Updated: June 25, 2014 00:41 IST2014-06-25T00:17:02+5:302014-06-25T00:41:19+5:30
हिंगोली : शहरातील वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची ‘हिरोगिरी’ वाहनधारकांच्या मुळावर आल्याचा प्रसंग मंगळवारी शहरातील बडोदा बँकेच्या समोर अकोला रस्त्यावर घडला.
वाहतुक पोलिसांची ‘हिरोगिरी’ वाहनाधारकांच्या मुळावर
हिंगोली : शहरातील वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची ‘हिरोगिरी’ वाहनधारकांच्या मुळावर आल्याचा प्रसंग मंगळवारी शहरातील बडोदा बँकेच्या समोर अकोला रस्त्यावर घडला. वेळीच कंटनेर तारांच्या खालून निघून गेल्याने दुर्घटनाही टळली.
हिंगोली शहराबाहेरून जाणारा बायपास रस्ता दुरूस्त करण्यात आला आहे. तरीही शहरामधून परराज्यात जाणारी जड वाहने जाण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. सहाजिकच वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी याकडे कानाडोळा करून ‘पावती’ फाडण्याचे एक साधनच या वाहनांना बनविले आहे. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास शहरातील अकोला रोडवर बडोदा बँकेच्या समोरील रस्त्यावर वाहतुक शाखेचे ३ पोलिस कर्मचारी ‘पावत्या’ फाडण्याच्या बेताने उभे होते. याच वेळी हिंगोली शहरातून अकोल्याकडे जाणारा एम.एच.२० - एटी १९८९ या क्रमाकांचा कंटनेर शासकीय विश्रामगृहाकडून येत असल्याचे एका पोलिस कर्मचाऱ्यास दिसले. मोठे वाहन आल्याने ‘पावती’ ची सोय झाली, या उद्देशाने या पोलिस कर्मचाऱ्याने या वाहनाला बडोदा बँकेच्या समोर डाव्या बाजूला उभे केले. याच वेळी या बाजूला असलेल्या पोलवरील विजेच्या तारा लोंबकळत होत्या. कंटनेर बाजूला घेत असताना कंटनेरमधील क्लिनरने लाकडाच्या साह्याने या तारा उंचावण्याचा प्रयत्न केला; परंतु या तारा फारशा उंचावत नसल्याचे पाहून हातातील लाकूड बाजूला काढले व कंटनेर पुढे नेऊन उभा केला. या धक्याने तारा जोराने हलल्या व एकमेकांवर आदळल्याने थिणग्या पडल्या व एक तार तुटून जमिनीवर पडली. त्याच वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकल चालकांनी मोटारसायकली तशाच टाकून विजेचा धक्का लागेल, या भीतीने पळ काढला. अन्य वाहनेही जागच्या जागी थांबली. त्यामुळे काही वेळ या रस्त्यावरील वाहतुक खोळंबली. विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने विद्युत पुरवठा तातडीने खंडीत झाला. शिवाय ज्या वेळी विद्युत तारा जमिनीवर पडल्या त्यावेळी कोणीही त्या तारांखाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर काही वेळाने संबंधित तरूणांनी जवळ जाऊन मोटारसायकली घेतल्या. त्यानंतर ते निघून गेले. खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या घटनेमुळे गर्दी जमल्याने कंटनेर चालकाची ‘पावती’ वाहतुक पोलिसांना फाडता आली नाही. त्यामुळे कंटनेर अकोल्याच्या दिशेने निघून गेला. वाहतुक पोलिसांच्या या ‘हिरोगिरी’ मुळे मात्र उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)