स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देऊन शहराचा कायापालट करा
By Admin | Updated: November 14, 2015 00:51 IST2015-11-14T00:28:23+5:302015-11-14T00:51:39+5:30
आशपाक पठाण , लातूर लातूर शहरात स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. शिवाय, डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देऊन शहराचा कायापालट करा
आशपाक पठाण , लातूर
लातूर शहरात स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. शिवाय, डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय, पाणीटंचाईनेही उग्ररुप धारण केले असताना प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. यासंदर्भात आमदार अमित देशमुख यांनी मनपाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत शहराचा कायापालट करण्याची सूचना शुक्रवारी दिली.
बाभळगाव येथे लातूर शहर महानगरपालिकेचे विभाग प्रमुख, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, गटनेते नरेंद्र अग्रवाल, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अॅड. समद पटेल, तालुकाध्यक्ष दगडूसाहेब पडिले आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांकडून माहिती जाणून घेतली. शहरात स्वच्छतेविषयी वाढत्या तक्रारी कमी झाल्या पाहिजेत, कर्मचाऱ्यांचा तुटवडा असेल तर तात्काळ रोजंदारीवर कर्मचारी घेऊन कामे सुरू करा. शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता विभागाचा कर्मचारी पोहोचला पाहिजे, यासाठी नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर पाणीटंचाई वाढली असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, यासाठी मीटर बसविण्याची मोहीम सुरू करा. पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, यासाठी नळाला मीटर बसविणे गरजेचे आहे. प्रथम नगरसेवक, कर्मचाऱ्यांच्या घरी मीटर बसवा. त्यानंतर ही मोहीम शहरभर राबवा, अशी सूचनाही आ. देशमुख यांनी केली.