'लिगो’ प्रयोगशाळेच्या जमिनींचे झाले हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:38 IST2017-08-05T17:37:30+5:302017-08-05T17:38:28+5:30
शासकीय जमिनीच्या मुल्यांकनापोटी भारत सरकारने ६० लाख ११ हजार ९६७ रूपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यानुसार जमिनीचा सातबारा आता या प्रोजेक्टसाठी भारत सरकार अणूऊर्जा विभागाच्या नावे करण्यात आला आहे.

'लिगो’ प्रयोगशाळेच्या जमिनींचे झाले हस्तांतरण
ऑनलाईन लोकमत
औंढा नागनाथ (जि. हिंगोली ), दि. ५ : भारत सरकार अणूऊर्जा विभागाच्या वतीने स्थापन करण्यात येत असलेल्या ' लिगो इंडिया' या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी महसूल विभागाच्या वतीने आज लिगो इंडियाच्या अधिका-यांना जमिनींचा ताबा देण्यात आला. जमिनीचा ताबा मिळाल्याने आता प्रयोगशाळेच्या उभारणीच्या कामातील मोठा अडथला दूर झाला आहे.
जगातील तिसरी लेझर ‘इंटरफेरोमेटर ग्रॅव्हीशनल व्हेव ऑबझर्व्हव्हेटरी प्रोजेक्ट’ म्हणजे अंतराळातील लक्षवेधी लहरींचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील जमिन उपयुक्त असल्याचा अहवाल या प्रोजेक्टसाठी दिला होता. त्या अनुषंगाने या प्रोजेक्टसाठी आवश्यक असणारी १७३ हेक्टर जमिनीची मागणी हिंगोली महसूल विभागाकडे नोंदविली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी हा प्रोजेक्ट लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने जमिन हस्तांतरणाच्या कारवाईस गती दिली होती.
लिगो प्रोजेक्टने मागणी केलेल्या जमिनीपैकी गट क्रं. ४१२ क्षेत्रातील २४ हेक्टर २२ आर. पैकी ५ हेक्टर ३६ आर., गट क्रं. ४२५ मधील १६ हेक्टर ४६ आर. पैकी ६ आर. तसेच वाडीबेचीराग गावठाण क्षेत्रातील १ हेक्टर ४३ आर. पैकी ५२ आर. अशी एकूण ५ हेक्टर ९४ आर. जमीनची शासन निर्देशानुसार अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष व सचिव यांच्या नावे सातबारामध्ये नोंद करण्यात आली आहे.
यासाठी शासकीय जमिनीच्या मुल्यांकनापोटी भारत सरकारने ६० लाख ११ हजार ९६७ रूपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यानुसार जमिनीचा सातबारा आता या प्रोजेक्टसाठी भारत सरकार अणूऊर्जा विभागाच्या नावे करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी भंडारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी जमिनीचा ताबा लीगोच्या शास्त्रज्ञाना दिला आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी कुरवाडे, लिगोचे शास्त्रज्ञ मिलींद गोवर्धन, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मंडळ अधिकारी आनंद शिंदे, तलाठी विजय सोमटकर आदींची उपस्थिती होती.