क्रीडा शिक्षकांचे नावापुरते प्रशिक्षण !
By Admin | Updated: March 4, 2017 00:26 IST2017-03-04T00:25:27+5:302017-03-04T00:26:25+5:30
लातूर : खेळांचे नवीन तंत्र व बदललेल्या नियमांची माहिती व्हावी म्हणून क्रीडा शिक्षकांना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे

क्रीडा शिक्षकांचे नावापुरते प्रशिक्षण !
लातूर : खेळांचे नवीन तंत्र व बदललेल्या नियमांची माहिती व्हावी म्हणून क्रीडा शिक्षकांना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र या प्रशिक्षणाला अनेक शिक्षकांनी दांडी मारली असून, ११० पैकी केवळ ७८ शिक्षकच उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी तर केवळ ५६ क्रीडा शिक्षकच प्रशिक्षणाला उपस्थित होते. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षणाला पाठवीत नसल्याने अनुपस्थितीचे प्रमाण अधिक असल्याचे क्रीडा कार्यालयातून सांगण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुलावर विविध खेळांचे प्रशिक्षण १ मार्चपासून सुरू झाले आहे. १ ते १० मार्च या कालावधीत मास्टर ट्रेनरकडून या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आहे. दररोज सकाळी ७ ते ९ प्रॅक्टिकल आणि १० ते १२ या वेळेत थिअरी. पुन्हा दुपारच्या सत्रात १२ ते ४ थिअरी आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत प्रात्यक्षिक घेण्यात येते. दररोज या वेळापत्रकानुसार विविध खेळांमध्ये बदललेले तंत्र आणि नियमांची माहिती क्रीडा शिक्षकांना व्हावी म्हणून प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षित शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना हे ज्ञान मिळावे हा हेतू या प्रशिक्षणामागचा आहे. परंतु, मुख्याध्यापक शाळेतून परवानगी देत नसल्याचे कारण पुढे करून अनेक क्रीडा शिक्षकांनी या प्रशिक्षणाकडे पाठ फिरविली आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयाने जिल्ह्यातील ११० क्रीडा शिक्षकांना पत्र पाठवून प्रशिक्षणात सहभागी होण्याच्या सूचना केल्या. त्यापैकी केवळ ७८ जणांची नोंद झाली आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी १ मार्च रोजी केवळ ५६ क्रीडा शिक्षक उपस्थित होते. तर दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी आणखी चार शिक्षकांची भर पडली असून, ३ मार्च रोजी ७८ पर्यंत ही संख्या गेली. कागदोपत्री अशी नोंद असली, तरी प्रत्यक्ष प्रशिक्षणाला गैरहजर राहण्याचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या दिवशी प्रात्यक्षिक सत्रात केवळ २५ ते ३० शिक्षकांचीच उपस्थिती होती. थिअरीला मात्र त्यात भर पडून ४० पर्यंत संख्या होती. २ व ३ मार्च रोजी ६० शिक्षकांनी प्रात्यक्षिक व थिअरीचे प्रशिक्षण घेतले आहे. दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत प्रात्यक्षिक असते. या प्रात्यक्षिकालाच गैरहजेरीचे प्रमाण अधिक आहे. (प्रतिनिधी)