शिकाऊ डॉक्टर तरुणीचा मावशीच्या घरावर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:48 IST2017-07-28T00:48:55+5:302017-07-28T00:48:55+5:30
औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षणानिमित्त घर राहण्यास दिलेल्या बहिणीच्या मुलीनेच वाहनचालकाच्या मदतीने घर साफ करीत मावशीला तब्बल २५ लाख रुपयांचा चुना लावला.

शिकाऊ डॉक्टर तरुणीचा मावशीच्या घरावर डल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षणानिमित्त घर राहण्यास दिलेल्या बहिणीच्या मुलीनेच वाहनचालकाच्या मदतीने घर साफ करीत मावशीला तब्बल २५ लाख रुपयांचा चुना लावला. तिने आपले काका, अनिवासी डॉक्टरांच्या घरातून रोख पाच लाख रुपये, सोने-चांदीचे दागिने, मोपेड आणि कार आदी सुमारे २० ते २५ लाखांच्या ऐवजासह पोबारा केला. १० जुलै रोजी सिडको एन-४ मध्ये ही घटना घडली. पळून जाताना या मुलीने आपण केलेल्या या चोरीची माहिती पत्राद्वारे मावशीला कळविली.
सुकेशिनी बापूराव येरमे आणि वाहनचालक राजू माटे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, एनआरआय डॉ. शिवाजी गुणाले आणि वत्सला गुणाले हे पती-पत्नी मागील सहा ते सात वर्षांपासून अमेरिकेत राहतात. त्यांचा सिडको एन-४ मध्ये बंगला आहे. सुकेशिनी ही वत्सला यांच्या बहिणीची मुलगी आहे. ती बालपणापासून शिक्षणाच्या निमित्ताने गुणाले दाम्पत्याकडे राहत होती. तिने तीन वर्षांपूर्वी एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता. गुणाले कुटुंबाकडे होंडासिटी कार असून, आरोपी राजू माटे हा अनेक वर्षांपासून त्यांचा कारचालक आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत गुणाले दाम्पत्याने सुकेशिनीच्या सोयीसाठी तिच्या ताब्यात बंगला दिला. सुकेशिनीला कॉलेजला नेणे-आणण्याची जबाबदारी कारचालक माटेवर सोपविली होती. बहिणीचीच मुलगी आणि बालपणापासून त्यांच्याकडे असल्याने गुणाले दाम्पत्यांनी संपत्तीची सर्व जबाबदारी सुकेशिनीवर टाकली. मात्र, सुकेशिनी आणि चालक माटे यांनी संगनमत करून वत्सला यांचे एटीएम कार्ड वापरून तब्बल पाच लाख रुपये काढून घेतले.
घरातील रोकड, सोने-चांदीचे दागिने, मोपेड आणि कार असा सर्व ऐवज घेऊन ते महिनाभरापूर्वी पसार झाले.