निधी खर्चातही पिछाडीवर ! जिल्ह्यात ‘रोहयो’ला उतरतीकळा !
By Admin | Updated: July 6, 2015 00:18 IST2015-07-06T00:16:17+5:302015-07-06T00:18:50+5:30
उस्मानाबाद : एकेकाळी मजुरांसाठी वदान ठरलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेला जिल्ह्यामध्ये उतरतीकळा लागली आहे.

निधी खर्चातही पिछाडीवर ! जिल्ह्यात ‘रोहयो’ला उतरतीकळा !
उस्मानाबाद : एकेकाळी मजुरांसाठी वदान ठरलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेला जिल्ह्यामध्ये उतरतीकळा लागली आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार ४ ते १० जून या कालावधीत पावणेनऊशे कामे सुरू होती. यावर तब्बल वीस हजारावर मजूर कार्यरत होते. यानंतरच्या आठवड्यात ही संख्या वाढण्याऐवजी प्रचंड गतीने खाली आली. १८ ते २४ जून या कालावधीत १९७ कामांवर अवघे ३ हजार ३९० मजूर कार्यरत होते. एकूणच महिनाभरातील मजूर उपस्थितीवर नजर टाकली असता रोजगार हमी योजनेला उतरतीकळा लागल्याचे दिसून येते.
मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेला चार-पाच वर्षांपूर्वी चांगला प्रतीसाद लाभत होता. कामे आणि मजुर उपस्थितीचा आलेख उंचाववलेला असायचा. परंतु, मागील एक-दोन वर्षांपासून या योजनेला प्रचंड मरगळ आली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायतस्तरावर ५१३ कामे सुरू होती. या कामांवर ९ हजार ५८ तर यंत्रणामार्फत सुरू असलेल्या ३८० कामांवर ११ हजार ३५३ मजूर कार्यरत होते, असे प्रशासनाचा अहवाल सांगतो. यानंतरच्या आठवड्यात मात्र, मजुरांची संख्या झपाट्याने कमी झाली. ११ ते १७ जून या कालावधीत ग्रामपंचायतस्तरावर ४४२ कामे सुरू होती. जवळपास ७१ कामे कमी झाली. हीच अवस्था यंत्रणास्तरावर सुरू असलेल्या कामांच्या बाबतीत आहे. अवघी ७३ कामे सुरू होती. परंडा आणि कळंब या दोन तालुक्यात तर यंत्रणेकडून हात पूर्णत: आखडला गेला होता. या कामांच्या माध्यमातून १ हजार ४३२ मजुरांच्या हाताला काम मिळाले, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, तिसऱ्या आठवड्यात तर ‘रोहयो’ योजनेला प्रचंड मरगळ आली. ग्रामपंचायत स्तरावरील कामांची संख्या ४४२ वरून १५६ पर्यंत खाली आहे. याच गतीने मजूर संख्याही कमी झाली. अवघे २ हजार ५५४ मजूर कार्यरत होते. यंत्रणास्तरावरील कामांची संख्या तर प्रशासनाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. जिल्हाभरात मिळून अवघी ४१ कामे सुरू होती. या माध्यमातून केवळ ७५६ मजुरांच्या हाताला काम मिळत होते. एकूणच ‘रोहयो’च्या प्रगतीपुस्तकावर नजर टाकली असता रोहयोला प्रचंड गतीने आलखे घसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता ही योजना गतीमान करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. जे की तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी केले होते. जिल्हा, तालुकास्तरावर सरपंच आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त बैठका घेवून योजनेला गती देण्याचे काम केले होते. (प्रतिनिधी)
यंत्रणा गतीमान होणार कधी?
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यंत्रणेमार्फत जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कामे सुरू होती. त्यानंतरच्या आठवड्यात (११ ते १७ जून) मात्र, परंडा आणि कळंब या दोन्ही तालुक्यात एकही काम सुरू नव्हते. त्यानंतर १८ ते २४ जून या कालावधीतही काही वेगळे चित्र नव्हते. उपरोक्त दोन्ही तालुक्यात एकही काम सुरू झाले नाही. तुळजापूर, वाशी आणि उमरगा तालुक्यात प्रत्येकी दोनच कामे सुरू होती. तर भूम तालुक्यातील आठ कामांचा समावेश होता. कामांची ही संख्या पाहिल्यानंतर यंत्रणास्तरावरील कामांना गती येणार कधी? असा प्रश्न निर्माण होत आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत निधीची कमतरता नाही. कितीही निधी उपलब्ध होत आहे. परंतु, उस्मानाबाद निधी खर्चातही पिछाडीवर आहे. जिल्हा १८ व्या स्थानावर आहे. तर गोंदिया पहिल्या क्रमांकावर असून ५१३४.३७ लक्ष रूपये खर्च केले आहेत. तर उस्मानाबादचा खर्च अवघा १२९०.४७ लाख रूपये इतका अत्यल्प आहे. मराठवाड्याच विचार केला असता बीड अव्वल आहे. त्यानंतर जालना, नांदेड, लातूर आणि औरंगाबादचा क्रमांक लागतो.