एसटीच्या संपाने प्रवाशांची त्रेधा
By Admin | Updated: December 17, 2015 23:59 IST2015-12-17T23:50:22+5:302015-12-17T23:59:55+5:30
परभणी : एसटी कर्मचाऱ्यांनी पगार वाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे परभणी विभागातील बहुतांश बसफेऱ्या गुरुवारी रद्द झाल्या़

एसटीच्या संपाने प्रवाशांची त्रेधा
परभणी : एसटी कर्मचाऱ्यांनी पगार वाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे परभणी विभागातील बहुतांश बसफेऱ्या गुरुवारी रद्द झाल्या़ सकाळी ९ वाजेपासून जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांमध्ये बसेसची वाट पाहत प्रवाशांची गर्दी दिसून आली़ मात्र सायंकाळपर्यंत संप सुरू असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची चांगलीच त्रेधा उडाली़ या संपामुळे बाहेरगावी ये-जा करणाऱ्या अनेकांना पर्यायी वाहनांनी जावे लागले़
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने राज्य शासनाकडे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी वेळोवेळी निवेदन देण्यात आले़ यानुसार चर्चा केल्यानंतर मागणी मान्य झाल्यास संप न करण्याचा निर्णयही संघटनेने घेतला होता़ परंतु, याबाबत राज्य शासनाकडून कोणताही विचार विनीमय न झाल्याने राज्यव्यापी बंदचे आयोजन १७ डिसेंबर रोजी इंटक संघटनेने केले होते़ त्यानुसार परभणी येथेही गुरुवारी संप करण्यात आला़ परभणी विभागात असलेल्या सर्व आगाराच्या बसफेऱ्या गुरुवारी रद्द करण्यात आल्या़ कर्मचाऱ्यांचा, चालक, वाहकांचा यात मोठा सहभाग असल्याने ३० ते ४० फेऱ्याच परभणी विभागातून बाहेरगावी गेल्या़ दररोजच्या प्रमाणे गुरुवारी सकाळी अनेकांनी बसस्थानक गाठले असता, त्यावेळी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप असल्याने बस बंद असल्याचे अनेकांना कळाले़ त्यामुळे काही वेळ थांबून प्रवाशांनी पर्यायी वाहनाने जाणे पसंत केले़ सकाळी ९ वाजेपर्यंत परभणी बसस्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या २० बसेस सोडण्यात आल्या़ मात्र यानंतर आंदोलकांनी एकही बस बसस्थानकाच्या बाहेर जाऊ दिली नाही़ सकाळी ९़३० च्या सुमारास उड्डाणपुल परिसरात बस स्थानकातून निघालेल्या व बसस्थानकाकडे येणाऱ्या काही बस आल्या असता उड्डाणपूलावर ३ बसेसच्या टायरची हवा कर्मचाऱ्यांनी सोडली़ यानंतर उड्डाणपूल परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता़ बसमधील प्रवाशांना पायी जावे लागले़ तर या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावून परिस्थिती नियंत्रणात आणली़ उड्डाणपूल परिसरात सर्व वाहने ऐन रस्त्याच्या मधोमध हवा सोडून लावण्यात आल्याने उर्वरित वाहतूक उड्डाणपुलाच्या खालील रस्त्याने वळविण्यात आली़ याचा शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला़ दुपारी २ वाजेपर्यंत एक ते दोन तासाला एखादी बस बसस्थानकात येत होती़ मात्र बस आल्यावर त्या बसमध्ये जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी दिसून येत होती़ परभणी आगारासह जिंतूर, गंगाखेड, वसमत, कळमनुरी, हिंगोली येथील आगारातून सुटणाऱ्या अनेक बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या़ यामुळे हजारो प्रवाशांची अडचण झाली़ रात्री ९ वाजेपर्यंत संप मिटला नसल्याने आगारातून एकही बस बाहेर गेली नाही़ (प्रतिनिधी)