अवैध वाहतूकदारांची धरपकड
By Admin | Updated: July 26, 2016 00:13 IST2016-07-26T00:07:54+5:302016-07-26T00:13:17+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

अवैध वाहतूकदारांची धरपकड
औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दिवसभर आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी अवैध वाहतूकदारांची धरपकड केली. यामध्ये पथकांनी अनेक भरधाव वाहनांचा पाठलाग करून कारवाई केली. त्यामुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले. कारवाईदरम्यान अनेक वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे अशा वाहनांमधून प्रवास करणे प्रवाशांनाही महागात पडले.
सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे जाणारा टेम्पो पुलावरून गिरिजा नदीपात्रात कोसळल्याची घटना २० जुलै रोजी पाथ्रीजवळ घडली. जिल्हाधिकारी कार्यालयात २१ रोजी पार पडलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. यानुसार सोमवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली. आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई करून अवैध वाहतूकदारांची धरपकड केली. जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली.
कारवाईमध्ये जप्त केलेली वाहने आरटीओ कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली. यामध्ये जीप, ट्रॅक्ससह मालवाहू वाहनांचा समावेश होता. कारवाईच्या पहिल्याच दिवशी ४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २१ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईची कल्पना असल्याने अनेकांनी वाहन रस्त्यावर आणले नाही. त्यामुळे या कारवाईमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात टाक णाऱ्या अवैध वाहतूकदारांवर चाप बसत आहे.