वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यास मारहाण
By Admin | Updated: September 11, 2014 01:06 IST2014-09-11T00:33:45+5:302014-09-11T01:06:30+5:30
उस्मानाबाद : वाहन चालविण्याचा परवाना विचारणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यास मारहाण
उस्मानाबाद : वाहन चालविण्याचा परवाना विचारणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनी त्यास पकडून वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणल्यानंतर टेबलाच्या काचावर, भिंतीवर डोके आपटून स्वत: जखमी होत पोलिसांना अडकाविण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उस्मानाबाद शहरात घडला़
पोलिसांनी सांगितले की, वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी सचिन खंडेराव व इतर कर्मचारी नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी शिवाजी चौकात वाहनांची तपासणी करीत होते़ त्यावेळी आलेल्या अभिषेक राजाभाऊ माने (रा़तुळजापूर) यास खंडेराव यांनी वाहन परवाण्याची विचारणा केली़ त्यावेळी माने याने अरेरावीची भाषा करीत पोलिस कर्मचाऱ्याच्या गचांडीस पकडून मारहाण केली़ या प्रकारानंतर माने यास वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणले़ त्यावेळी माने याने ‘तुम्ही मला ओळखत नाही, मी जीव देवून तुम्हाला अडकाविन’ अशी धमकी देत टेबलावरील काचावर, भिंतीवर डोके आदळून घेतले़ या प्रकरणी पोकॉ सचिन खंडेराव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान, स्वत:चे डोके भिंतीवर, टेबलावर आदळून घेणाऱ्या माने यास जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, त्यास पुढील उपचारासाठी सोलापूर येथील जिल्हा रूग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले़ या घटनेचा अधिक तपास सपोनि महानभाव हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)