वाहतूक शाखेला मनपाचा ठेंगा़़!
By Admin | Updated: May 10, 2014 23:54 IST2014-05-10T23:15:07+5:302014-05-10T23:54:13+5:30
आशपाक पठाण, लातूर लातूर शहरातील सिग्नल दुरुस्तीची जबाबदारी मनपाकडे असताना बंद पडलेल्या सिग्नलकडे डोळेझाक केली जात आहे़

वाहतूक शाखेला मनपाचा ठेंगा़़!
आशपाक पठाण, लातूर लातूर शहरातील सिग्नल दुरुस्तीची जबाबदारी मनपाकडे असताना बंद पडलेल्या सिग्नलकडे डोळेझाक केली जात आहे़ त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहन उचलण्यासाठी मनपाने वाहतूक शाखेला दिलेली टोर्इंग व्हॅन काढून घेतली आहे़ ही व्हॅन व सिग्नल दुरुस्तीसाठी शहर वाहतूक शाखेने मनपाकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही या पत्रांना मनपाकडून ठेंगा दाखविला जात आहे़ लातूर शहरात वाहतूक कोंडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे़ गंजगोलाई, मध्यवर्ती बसस्थानक, गुळमार्केट, मार्केट यार्ड, शिवाजी चौक, मिनी मार्केट आदी ठिकाणी नेहमीच वाहनांची कोंडी होते़ गूळमार्केट ते बसवेश्वर चौक या भागात दिवसभर वाहतुकीची कोंडी असते़ व्यापार्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक समस्या भेडसावत असताना याकडे मात्र डोळेझाक करण्यात आली आहे़ तसेच प्रमुख मार्गावर असलेल्या इमारतींमध्ये कार्यालये वाढली़ विविध कामांसाठी येणारे वाहनधारकांना पार्किंगसाठी रस्त्यावरच जागा असल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत़ रस्त्यांवर लावण्यात आलेली वाहने उचलण्याठी महानगरपालिकेने टोर्इंग वाहन वाहतूक शाखेला दिले़ या वाहने उचलणार्या गाडीसोबत मनपाचे ४ व वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी कार्यरत होते़ पाच ते सहा महिने चालविण्यात आलेले हे वाहन मनपाकडून अचानकपणे बंद करण्यात आल्याने वाहतूक शाखेचीच कोंडी झाली़ यासंदर्भात शहर वाहतूक शाखेच्या वतीने मनपा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला असून अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात येत आहे़ शहरातील वाहतुकीची समस्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ वाहनधारकांची पिळवणूक़़़़ गूळ मार्केट चौकात जवळपास पाच रस्ते एकत्र येतात़ सिग्नल कधी सुरु तर कधी बंद असतात़ वाहनधारक सिग्नलकडे बघून जात असले तरी बिघडलेल्या सिग्नलमुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण होत आहे़ त्यातून वाहतूक शाखेचे पोलिस मात्र दंडात्मक कारवाई करुन वाहनधारकांची पिळवणूक करीत आहेत़