अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा
By Admin | Updated: July 23, 2014 00:30 IST2014-07-22T23:00:58+5:302014-07-23T00:30:52+5:30
बीड: शहरातील अति रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी पार्किंग करत असल्याने वाहनकोंडी होत आहे.

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा
बीड: शहरातील अति रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी पार्किंग करत असल्याने वाहनकोंडी होत आहे. यामध्ये सुभाष मार्गावर मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावरच दुचाकी लावत असल्याने वाहनकोंडी होत असून रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.
अति रहदारीच्या मार्गावर तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील वाहतुकीचे तीन तेरा झाले आहेत, असा आरोप शहरातील नागरिकांनी केला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बहुतांश शाळा व महाविद्यालय आहेत. त्यातच विविध वस्तूंची दुकाने देखील शहरातील सुभाष मार्गावर आहेत. याचाच परिणाम भाजी मंडई व सुभाष रोड या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असते. परंतु खरेदीसाठी आलेल्यांनी वाहने पार्किंग करताना रस्त्याच्या बाजूला अंतर ठेवून करण्याचे ना संबंधित दुकानदार सांगतो, ना वाहतूक पोलिस सांगतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या कोंडीमुळे अपघात देखील होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भाजी मंडईत विद्यार्थी, पालकांची कोंडी
शहरातील भाजी मंडई भागात रस्त्याच्या दुतर्फा फळगाडे, भाजी विक्रेते बसलेले असल्याने अरूंद रस्त्यावरूनच दुचाकी व तीन चाकी वाहने ये-जा करतात. मात्र अनेकवेळी चार चाकी वाहने भाजी मंडईतून जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास शाळकरी विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांना घ्यायला आलेल्या पालकांना देखील सहन करावा लागत आहे. याबाबत शहर वाहतूक विभागाचे प्रमुख एम.ए. सय्यद यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, शहरातील सुभाष रोडवरील दुकानदारांना नोटिसा देऊन दुकानासमोरील पार्किंग हटविण्याचे सांगितले आहे. तसेच सुभाष रोड, भाजी मंडई भागात पार्किंग व्यवस्था करावी, याबाबत बीड न.प.ला अनेकवेळा पत्र दिलेले आहे, असे त्यांनी सांगितले.