व्यापाऱ्याचे घर फोडून ९ लाखांचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 01:06 IST2016-07-15T00:34:41+5:302016-07-15T01:06:09+5:30
औरंगाबाद : शहरात सुरू असलेले घरफोड्या व चोऱ्यांचे सत्र थांबायला तयार नाही. पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने बंद घरांना चोरटे लक्ष्य करीत आहेत.

व्यापाऱ्याचे घर फोडून ९ लाखांचा ऐवज पळविला
औरंगाबाद : शहरात सुरू असलेले घरफोड्या व चोऱ्यांचे सत्र थांबायला तयार नाही. पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने बंद घरांना चोरटे लक्ष्य करीत आहेत.
शहरातील सुराणानगर येथील व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ६ लाख रुपये, असा एकूण ९ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.याविषयी अधिक माहिती देताना जिन्सी पोलिसांनी सांगितले की, सुराणानगर येथील रहिवासी असलेले प्लायवूडचे व्यापारी प्रदीप इंदलचंद गंगवाल (४६) यांच्या नातेवाईकाचे वाशिम येथे लग्न होते. त्यामुळे गंगवाल हे संपूर्ण परिवारासह ५ जुलै रोजी वाशिम येथे गेले होते.
लग्न समारंभ आटोपून ते १३ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास औरंगाबादला परतले. त्यावेळी त्यांनी घर उघडले असता घरातील सामान अस्ताव्यस्त झालेले दिसले. चोरट्यांनी घर फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या घटनेची माहिती तातडीने जिन्सी पोलिसांना कळविली.
पोलीस निरीक्षक श्याम वासूरकर, पोलीस उपनिरीक्षक पांचाळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा चोरट्यांनी टेरेसवर चढून खिडकीचा गज तोडून बंगल्यात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांमध्ये लहान मुलाचा समावेश असावा, असा पोलिसांना संशय आहे. आरोपींनी गंगवाल यांच्या बंगल्यातून रोख ६ लाख रुपये आणि ३ लाख ३९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे समजले. या घटनेप्रकरणी गंगवाल यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही चोरी ५ ते १३ जुलैदरम्यान झालेली आहे. दरम्यानच्या कालावधीत पाऊस पडलेला असल्यामुळे चोरट्यांचा माग काढणे श्वानपथकाला शक्य झाले नसल्याचे पोलीस निरीक्षक वासूरकर यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक पांचाळ या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.