व्यापाऱ्यांनी पाळला बंद
By Admin | Updated: July 23, 2014 00:35 IST2014-07-22T23:53:45+5:302014-07-23T00:35:07+5:30
जालना : चाकू व दांड्याने प्राणघातक हल्ला करून व्यापाऱ्याचे १० लाख लूटल्याच्या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी सिंधीबाजार भागासह इलेक्ट्रिकल्स व मोबाईल विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला.

व्यापाऱ्यांनी पाळला बंद
जालना : चाकू व दांड्याने प्राणघातक हल्ला करून व्यापाऱ्याचे १० लाख लूटल्याच्या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी सिंधीबाजार भागासह इलेक्ट्रिकल्स व मोबाईल विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. दरम्यान, आरोपींचा शोध तातडीने लावावा, या मागणीचे निवेदन व्यापाऱ्यांच्या वतीने सदर बाजार पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
शहरातील करवानगर येथील रहिवासी कमलेश धीरजकुमार कवरानी (वय २३) हे तरूण व्यापारी सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून दुचाकीवरून निवासस्थानाकडे निघाले. एका पावभाजी दुकानासमोर असलेल्या गतिरोधकाजवळ त्यांनी आपल्या दुचाकीचा (एम.एच. २१ सी.९५५०) वेग कमी केला. गतिरोधक पार करून पुढे जाताच वाहनाचा वेग वाढविला. त्याबरोबर उंच व काळ्या रंगाच्या एका युवकाने दांड्याने कवरानी यांच्यावर जबर वार केला. त्याबरोबर कवरानी खाली कोसळले. मात्र हातातील पैशांची पिशवी त्यांनी घट्ट पकडून ठेवली होती. त्यामुळे अन्य दोघांनीही येऊन कवरानी यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरूवात केली. मुख्य आरोपीने दांड्याने मारणे सुरूच ठेवले. त्यात पाय व हात फ्रॅक्चर झाले.
शिवाय चाकूने पाठीवर, मानेवर, दोन्ही हातांवर व पायांवर वार करून चोरट्यांनी त्यांना गंभीर जखमी केले. चोरट्यांनी कवरानी यांच्याजवळील १० लाख रूपयांची रोकड असलेली पिशवी घेऊन पोबारा केला. हा प्रकार अगदी पाच ते सात मिनिटांत झाला.
काही जणांनी हा प्रकार कवरानी यांच्या कुटुंबियांना सांगितला. इकडे जखमी अवस्थेत कवरानी यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या शरीरावर १५० टाके लावण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. रात्री १२ वाजता सदर बाजार पोलिस ठाण्यात सचिन सुरेशकुमार कवरानी यांच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कवरानी यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
एका तरूणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले मात्र तो आजारी असल्याने पुन्हा सोडून देण्यात आले. कवरानी यांचा जबाब सहायक निरीक्षक मनिष पाटील यांनी नोंदविला. यावेळी उपनिरीक्षक दत्तात्रय पवार, जी.बी. बुंदेले व जमादार प्रदीप भंडारे यांनी जबाब नोंदविला. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स तसेच मोबाईल विक्रेत्यांनी मंगळवारी आपले व्यवहार पूर्णत: बंद ठेवून निषेध नोंदविला. सदर बाजार पोलिस ठाण्यात निवेदन सादर करून चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
यावेळी आ. कैलास गोरंट्याल, जालना शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, विजयराज सुराणा, सुरेशकुमार कवरानी, अनिलकुमार कवरानी, धीरजकुमार कवरानी यांच्यासह तब्बल ५० ते ६० व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. आरोपींना अटक करण्यात आली नाही तर बेमुदत बंद पाळण्यात येणार असल्याचे व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
घटनेच्या निषेधार्थ सदर बाजार पोलिस निरीक्षकांना निवेदन
शहरात चोऱ्या, घरफोड्या व लुटमारीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भरदिवसा चोऱ्या होतात. तर रात्री ९-१० वाजता लुटमारीच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
जखमी कमलेश कवरानी यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तेथेच त्यांचा जबाब नोंदविला. एका संशयितास ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.