व्यापारी म्हणाले,‘आज उधार, कल नगद’
By Admin | Updated: November 10, 2016 00:09 IST2016-11-10T00:12:10+5:302016-11-10T00:09:22+5:30
बीड : ‘आज नगद, कल उधार’ अशा पाट्या व्यापारपेठेत ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये दिसून येतात.

व्यापारी म्हणाले,‘आज उधार, कल नगद’
बीड : ‘आज नगद, कल उधार’ अशा पाट्या व्यापारपेठेत ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये दिसून येतात. जास्तीत जास्त ग्राहकांनी रोखीचे व्यवहार करावेत, असा व्यापाऱ्यांचा हेतू असतो. बुधवारी ‘आज उधार, कल नगद’ असे उलटे चित्र पहावयास मिळाले. उधार न्या, पण हजार, पाचशेच्या नोटा नको, अशी विनंती व्यापारी ग्राहकांना करताना दिसून आले.
काही नागरिकांनी चिल्लर करण्यासाठी मुद्दामहून आटोपशीर खरेदी करण्याचा प्रयत्न केला; परंतु मोजक्या व्यापाऱ्यांनीच हजार, पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारल्या. काही व्यवहार उधारी, उसनवारीवरही झाले. व्यापाऱ्यांनी ओळखीच्या ग्राहकांना उधारीवर साहित्य पुरविले. अनेक गृहिणींकडे किराणा सामानासाठी पैसे नव्हते. ‘ताई, वहिनी, हवे ते घेऊन जा, पैसे कोठे जाणार आहेत ? जेव्हा येतील तेव्हा द्या’ अशा उदार मनाने व्यापारी ग्राहकांची सरबराई करताना दिसून आले. मोठ्या किंमतीच्या नोटांना कोणीच स्वीकारण्यास तयार नव्हते. बँका, एटीएम बंद असल्याने नव्या पैशांची उपलब्धीही अशक्य होती. त्यामुळे ग्राहकांनीही उधारी-उसनवारीवर खरेदी केली. अनेकांनी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करण्यावर भर दिल्याचेही व्यापारपेठेत पहावयास मिळाले.
जुनी उधारी वसूल
काहींकडे अनेक दिवसांपासून उधारी थकित होती. एरवी दुकानदारांनी मागूनही उधारी न देणारे ग्राहक आज स्वत:हून उधारी देण्यासाठी येत होते. हजार, पाचशेच्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बदलण्याची सुविधा आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही जुनी उधारी वसुली होत असल्याची संधी न दवडता पैसे स्वीकारले. (प्रतिनिधी)