विकासाच्या प्रश्नावर व्यापारी महासंघ आक्रमक
By Admin | Updated: May 22, 2014 00:35 IST2014-05-22T00:18:26+5:302014-05-22T00:35:49+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दयनिय अवस्था, सातत्याने होणारे विजेचे भारनियमन, ढेपाळलेली आरोग्य सेवा
विकासाच्या प्रश्नावर व्यापारी महासंघ आक्रमक
हिंगोली : जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दयनिय अवस्था, सातत्याने होणारे विजेचे भारनियमन, ढेपाळलेली आरोग्य सेवा या सर्व बाबींमुळे नागरिकांची होणारी हेळसांड पाहून जिल्हा व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली असून, १५ दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने या प्रश्नांमध्ये लक्ष न घातल्यास हिंगोलीची व्यापारपेठ बंद करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, सचिव सुभाषचंद्र लदनिया, नंदकिशोर तोष्णीवाल, शातीलाल जैैन, चंद्रशेखर निलावार, रत्नदीपक सावजी, धरमचंद बडेरा आदी व्यापार्यांनी बुधवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यामध्ये जिल्ह्यातील ढेपाळलेल्या मुलभूत सुविधांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हिंगोली ते कनेरगावनाका या रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून, हिंगोली शहरातील रस्तेही खराब झाले आहेत. त्यामुळे वाहतुकदारांना, नागरिकांना रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण बनले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुुरूस्तीच्या नावाखाली खोदकाम करून नागरिकांची गैरसोय केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे कसलेही गांभीर्य नाही. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निर्माण होणार्या धुळीने नागरिक, व्यापारी यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी तसेच राज्य मार्गावरील व शहरातील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रियागृह महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे रूग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागते. हे शस्त्रक्रियागृह तत्काळ सुरू करावे. हिंगोली शहरात ६ तास भारनियमन केले जाते. वास्तविक पाहता जेथे वीज चोरी आहे, तेथे भारनियमन करावे व तसे फिडर बाजूला काढावे. जे नागरिक व व्यापारी नियमित वीजबील भरतात, त्यांना नाहक त्रास का? असा सवाल करीत येत्या पंधरा दिवसांमध्ये यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा हिंगोलीची व्यापारपेठ बंद ठेवून व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)