सराफा व्यापाऱ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: March 18, 2016 00:07 IST2016-03-17T23:57:16+5:302016-03-18T00:07:09+5:30
परभणी : जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांनी गुरुवारी आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

सराफा व्यापाऱ्यांचा मोर्चा
परभणी : जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांनी गुरुवारी आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सराफा व सुवर्णकार व्यावसायिकांवर लादलेला अबकारी कर रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
अबकारी कर हा व्यापाऱ्यांसाठी जाचक असून तो रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी बंदचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात परभणी जिल्ह्यातील व्यापारी देखील सहभागी झाले असून १ मार्चपासून संपूर्ण सराफा बाजारपेठ बंद आहे. या आंदोलनांतर्गत परभणी जिल्हा सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. येथील शनिवार बाजारातून दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा मोर्चा निघाला. जिल्हाभरातील व्यापारी शनिवार बाजार येथे एकत्र झाले.
शनिवार बाजारातून नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, विसावा कॉर्नरमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी केंद्राच्या धोरणाचा निषेध नोंदविला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. असोसिएशनचे अध्यक्ष सचिन अंबिलवादे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांच्यासह इतरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.