‘इन्शुरन्स’साठी ट्रॅक्टर पुरला
By Admin | Updated: November 30, 2015 23:30 IST2015-11-30T23:24:04+5:302015-11-30T23:30:56+5:30
परंडा : तालुक्यातील वाकडी येथील ट्रॅक्टरच्या चोरी प्रकरणात फिर्यादीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभारला आहे़ ट्रॅक्टरची चोरी झाली नसून,

‘इन्शुरन्स’साठी ट्रॅक्टर पुरला
परंडा : तालुक्यातील वाकडी येथील ट्रॅक्टरच्या चोरी प्रकरणात फिर्यादीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभारला आहे़ ट्रॅक्टरची चोरी झाली नसून, इन्शुरन्स मिळविण्यासाठी फिर्यादीने स्वत:च्या शेतजमिनीतच ते ट्रॅक्टर पुरून टाकल्याचा उलगडा परंडा पोलिसांच्या सर्कतेमुळे झाला आहे़
मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील वाकडी येथील बालाजी ज्ञानदेव बानगुडे- पाटील यांनी ५ नोव्हेंबर रोजी परंडा पोलीस ठाणे गाठून सहा लाखाचे ट्रॅक्टर (क्ऱएम़एच़२५- ए़डी़०२४१) चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती़ तीन महिन्यांपूर्वी खरेदी केलेला ट्रॅक्टर काही कामे नसल्याने शेतवस्तीवर लावला होता़ मात्र, अज्ञातांनी तो लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले होते़ चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी सपोनि सुरेश सिरसट यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली़
ट्रॅक्टर लावलेल्या घटनास्थळ परिसराची सोमवारी पाहणी करतेवेळी बाजूलाच एका ठिकाणी लावलेले अँगल, टाकलेल्या काटाड्या, काठ्या, लाकडं आणि जागेची रूंदी पाहता पोलिसांचा या खाली ट्रॅक्टर गाढल्याचा संशय बळावला़ पोलिसांनी तात्काळ जेसीबी मागवून घेत संबंधित ठिकाणावरील साहित्य काढून खोदकाम सुरू केले़ जेसीबीने खोदकाम करताच चोरीस गेलेला ट्रॅक्टर जमिनीत पुरल्याचे दिसून आले़ या घटनेने खळबळ उडाली असून, चर्चेलाही ऊत आला आहे़ वाकडी येथील बालाजी बानगुडे- पाटील यांनी ट्रॅक्टरवरील असलेल्या इन्शुअरन्सची रक्कम उचलण्यासाठी हा सर्व बनाव रचल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले़ या चोरी प्रकरणाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपासाधिकारी सपोनि सुरेश सिरसाट यांच्यासह पोना बी़पी़ वाहिल, एस़आऱचौधरी, पोशि़ एस़आऱक्षीरसागर आदीनीही मोठी कामगिरी बजावली़ (वार्ताहर)