चिमुकल्यांच्या खाऊमध्ये विष ?

By Admin | Updated: July 3, 2014 00:15 IST2014-07-03T00:10:19+5:302014-07-03T00:15:16+5:30

गजानन घुंबरे , वाघाळा बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतून बालक व गरोदर मातांना दिला जाणारा पोषण आहार शिजवित असताना खाऊ शिजविण्याच्या भांड्यामध्ये संशयास्पदपणे भुकटी व पुडी दिसली.

Toxin in urine? | चिमुकल्यांच्या खाऊमध्ये विष ?

चिमुकल्यांच्या खाऊमध्ये विष ?

गजानन घुंबरे , वाघाळा
बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतून बालक व गरोदर मातांना दिला जाणारा पोषण आहार शिजवित असताना खाऊ शिजविण्याच्या भांड्यामध्ये संशयास्पदपणे भुकटी व पुडी निदर्शनास आल्याने पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे पालकांमध्ये खळबळ उडाली. खाऊ शिजविणाऱ्या दोन सेवकांनी एकमेकांविरोधात आरोप करीत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रकार २ जुलै रोजी घडला.
वाघाळा येथे बालविकास प्रकल्पांतर्गत तीन अंगणवाड्या असून त्यामध्ये शंभरहून अधिक बालक आहेत. या सर्व बालकांना व गरोदर मातांना याच अंगणवाड्यांमध्ये खाऊ शिजवून देण्यात येतो. त्याचे कंत्राट जय भवानी महिला बचत गटास दिले आहे. पहिली ते आठवीपर्यंत खाऊ शिजविण्याचे कंत्राट समर्थ महिला बचत गटाला दिले आहे. २ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता या दोन्ही गटांसाठी खाऊ शिजविण्याचे काम करणारे अण्णा खिस्ते व दत्ता लोणकर यांच्या हाणामारी झाली. सकाळी मोठ्या आवाजात होत असलेले हे भांडण ग्रामस्थांनी ऐकताच शाळेत धाव घेतली. अंगणवाडीतील खाऊमध्ये संशयास्पद भुकटी व कागदी पुडी ग्रामस्थांना दिसली. हा सर्व प्रकार पाहून ग्रामस्थांंनी त्याची माहिती संबंधितांना दिली. खाऊ शिजविणाऱ्या दोघांनीही पाथरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी अर्ज दिला आहे. पोलिसांंनी खाऊचे नमूने घेतले असून ते अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविले आहेत.
दरम्यान, या घटनेने ग्रामस्थ मात्र संतप्त झाले. सकाळी ७.३० ते २ या वेळेत त्यांनी शाळेत तळ ठोकला होता. आधीच दर्जाहीन खाऊ त्यात अशी संशयास्पद घटना घडत असेल तर आमची मुले अंगणवाडीत न पाठविलेली बरी, अशी प्रतिक्रिया सुरेश अंकुरे, राजेभाऊ अंकुरे, बाबासाहेब चाफाकानडे या पालकांनी दिली. या घटनेविषयी माहिती कळताच बालविकास प्रकल्प अधिकारी आर. एच. पठाण, जि. प. सदस्य दादासाहेब टेंगसे यांनी अंगणवाड्यांना भेट देऊन पाहणी केली.
अहवाल आल्यानंतर गुन्हे
वाघाळा येथील अंगणवाडीमध्ये खाऊ शिजविण्याचे काम करणाऱ्या सेवकांच्या तक्रारीवरून आम्ही वाघाळा येथे जाऊन खाऊचे व त्या ठिकाणी सापडलेल्या पावडरचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवित असून त्या संबंधीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल करू, असे पोलिस निरीक्षक एन. बी. ठाकूर यांंनी सांगितले.
प्रकार गंभीर
खाऊ शिजविताना स्वच्छतेचे व सुरक्षेचे काही निकष आहेत. खाऊ शिजविणाऱ्यांनी अन्न शिजल्यानंतर ते स्वत: खाऊन चव पाहणे अपेक्षित आहे. त्यानंतरच ते बालकांना व गरोदर मातांना देता येते. हा प्रकार गंभीर असून याविषयी प्रकार कळताच आम्ही थेट अंगणवाडी गाठली असून यावर पोलिस प्रशासनासह वरिष्ठांना कळविणार आहोत, असे बालविकास प्रकल्प अधिकारी आर.एच. पठाण यांंनी सांगितले.
तर कारवाई व्हावी
तत्काळ चौकशी होऊन विष आढळून आल्यास जनभावना लक्षात घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच विकास घुंबरे, गणेश घुंबरे, माणिकअप्पा कंदेरे, शेख इस्माईल, अतुल घुंबरे, सुशील घुंबरे आदी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे केली.

Web Title: Toxin in urine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.