टाऊनशिप बारगळणार!
By Admin | Updated: June 24, 2017 23:46 IST2017-06-24T23:46:02+5:302017-06-24T23:46:22+5:30
जालना : शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास विरोध होत असल्याने टाऊनशिप बारगळण्याची चिन्हे आहेत.

टाऊनशिप बारगळणार!
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर जालना व औरंगाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र (स्मार्ट टाऊनशिप) विकसित करण्याचे नियोजित आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास विरोध होत असल्याने टाऊनशिप बारगळण्याची चिन्हे आहेत.
कुठल्याही महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरी भागालगत झपाट्याने विकास होता. दु्रतगती महामार्गावर जोडणीच्या ठिकाणी होणारा अनियंत्रित विकास टाळण्यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर २४ ठिकाणी सुनियोजित पद्धतीने स्मार्ट टाऊनशिप विकसित करण्यात येणार आहे. जालना तालुक्यातील जामवाडी, गुंडेवाडी व औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा-करमाड, दौलताबाद व वैजापूर येथे टाऊनशिपचे नियोजन आहे. पाचशे हेक्टरवर होणाऱ्या या टाऊनशिपमध्ये कृषी पूरक उद्योग, शीतगृह, गोदाम, महामार्ग पर्यटन केंद्र, फूड मॉल, पेट्रोलपंप, मनोरंजन मॉल, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सुविधा केंद्र इ. २१ प्रकारच्या सुविधा असणार आहेत. या महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना लॅण्ड पुलिंग मॉडेलनुसार स्मार्ट टाऊनशिपमध्ये एकूण जमिनीच्या २५ व ३० टक्के विकसित भूखंड व कृषी मालाचा दहा वर्षांपर्यंत वाढीव मोबदला देण्याचे शासनाने निश्चित केले होते. मात्र, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात लॅण्ड पुलिंगला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शिवाय स्मार्ट टाऊनशिपसाठी पाचशे हेक्टर जमीन देण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे येथे स्मार्ट टाऊनशिप होणार का याबाबत अनिश्चितता आहे.