पर्यटन राजधानीचा कचरा होऊ नये; पर्यटक व्यावसायिकांनी व्यक्त केली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 18:40 IST2018-03-01T18:39:08+5:302018-03-01T18:40:22+5:30
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी बिरुदावली मिरवणार्या औरंगाबाद शहराचा गेल्या काही दिवसांपासून जणू काही ‘कचरा’च झाला आहे. याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होणार अशी भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केली.

पर्यटन राजधानीचा कचरा होऊ नये; पर्यटक व्यावसायिकांनी व्यक्त केली चिंता
औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी बिरुदावली मिरवणार्या औरंगाबाद शहराचा गेल्या काही दिवसांपासून जणू काही ‘कचरा’च झाला आहे. याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होणार अशी भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केली.
नारेगाव कचराडेपोमध्ये कचरा टाकू देण्यास नकार दिल्यामुळे शहरातील रस्त्यांवरच कचर्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ राहिले बाजूला आणि सर्वत्र कचराच दिसत आहे. औरंगाबाद लेणी, पाणचक्की आणि बीबी का मकबर्याचे सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना कचर्यांचे हे ढीग पाहत जावे लागत आहे. पर्यटन राजधानीचे असे हाल पाहून पर्यटकांमध्ये नकारात्मक संदेश जात असून, कचराकोंडीवर लवकरच तोडगा निघाला नाही, तर पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.
कॅनडाहून आलेले पर्यटक अॅलन यंग यांनी भारताच्या विविध शहरांना भेटी दिलेल्या आहेत. मागच्या दोन दिवसांपासून ते शहरात आहेत. ‘भारत हा फार सुंदर देश आहे. तो अजून सुंदर होऊ शकतो. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या आधुनिक सुविधा अमलात आणण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले. यंग यांनी कॅनडात पत्रकारिता केलेली आहे. सध्या ते दुसर्यांदा भारत भेटीवर आलेले आहेत. त्यांचा अनुभव सांगताना ते म्हणाले, कचरा व्यवस्थापन हा गंभीर प्रश्न असून, त्यामध्ये केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी मुंबई, गोवा, कोची, भोपाळ, हैदराबाद, आग्रा, अहमदाबाद अशा विविध शहरांना भेटी दिलेल्या असून, त्यांच्या तुलनेत औरंगाबाद अधिक स्वच्छ असल्याचे सांगताना घनकचरा व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
अशीच भावना भारतीय पर्यटक आणि गाईड यांनीदेखील बोलून दाखविली. ‘रस्त्यावर कचर्याचे ढीग साचने हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत वाईट चित्र आहे. कचराकोंडी अशीच कायम राहिली, तर पर्यटनस्थळांभोवतीही कचरा साचू लागेल. तेव्हा काय करणार?’ असा सवाल गाईड आणि पर्यटक व्यावसायिकांनी केला. ऐतिहासिक पर्यटन शहर म्हणून औरंगाबादचा प्रचार केला जातो. तेथेच सर्वत्र कचरा दिसत असेल तर पर्यटकांनी का म्हणून येथे यावे? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
आता कचर्याची भर नको
दळणवळणाची असुविधा आणि मार्केटिंग नसल्यामुळे आधीच औरंगाबाद शहरातील पर्यटनाचा हंगाम नऊ महिन्यांऐवजी तीन महिन्यांवर आला आहे. त्यात कचर्याची भर पडून हे तीन महिनेदेखील हातचे जायला नकोत.
- जसवंत सिंग, पर्यटन व्यावसायिक