पर्यटनाची राजधानी खड्ड्यात

By Admin | Updated: August 4, 2016 23:54 IST2016-08-04T23:54:28+5:302016-08-04T23:54:55+5:30

औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण शहरच खड्ड्यात गेले आहे. शहरातील रस्त्यांवर पावलोपावली मोठमोठे खड्डे पडले आहेत.

Tourism in the capital of the pits | पर्यटनाची राजधानी खड्ड्यात

पर्यटनाची राजधानी खड्ड्यात

औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण शहरच खड्ड्यात गेले आहे. शहरातील रस्त्यांवर पावलोपावली मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे मणक्याच्या त्रासाबरोबरच वाहनचालकांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: दुचाकीचालकांना अगदीच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शहरात एकूण तेराशे किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. यातील केवळ चार रस्त्यांवरच तब्बल सोळाशे खड्डे असल्याचे पाहणीत आढळून आले.
राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादनगरीतील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सद्य:स्थितीत शहरात एकही रस्ता विनाखड्ड्यांचा उरलेला नाही. दुसरीकडे रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी असलेले मनपा प्रशासन काहीही करताना दिसत नाही. लोकमतच्या टीमने गुरुवारी शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली.
तेव्हा यातील चार रस्त्यांवरच तब्बल १६२८ खड्डे आढळून आले. सेव्हन हिल ते सूतगिरणी चौक, आझाद चौक ते जुना बाजार, एमजीएम-आविष्कार कॉलनी- बजरंग चौक, मोंढानाका-लक्ष्मण चावडी-सिल्लेखाना- मध्यवर्ती बसस्थानक या चार रस्त्यांवर हे खड््डे आढळले. यातील अनेक खड्डे जीवघेण्या स्वरुपाचे आहेत.
आतापर्यंतचे सर्व प्रयोग अयशस्वी
खड्डे बुजविण्याबाबत आतापर्यंत केलेले सर्व प्रयोग अयशस्वी झाले आहेत. पावसाळ्यात डांबराने खड्डे बुजविले जाऊ शकत नाहीत. गतवर्षी कोल्डमिक्सचा प्रयोग केला. परंतु तांत्रिकदृष्ट्या त्याला उशीर लागतो. शिवाय पावसात काँक्रीटनेही खड्डे बुजविणे संयुक्तिक नाही. त्यामुळे सध्या पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्यात येत आहेत. तूर्तास जास्त वर्दळीच्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
- सखाराम पानझडे, शहर अभियंता, मनपा
अधिकाऱ्यांची डोळेझाक
रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच शहरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काही प्रमाणात पदाधिकारी तरी चांगल्या कामांसाठी प्रयत्नशील असतात; परंतु अधिकारी मात्र पूर्णपणे डोळे बंद करून बसले आहेत. खरे तर तीन वर्षांच्या आत रस्ता खराब होता कामा नये. त्यानंतरही एकदा सरफेसिंग केल्यावर त्याचे आयुष्य आणखी तीन वर्षे वाढायला हवे.
- एम. डी. सोनवणे, सेवानिवृत्त अधिकारी
रस्त्यात निव्वळ खड्डे,अवैध पार्किंग
शहरातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या आझाद चौक ते रोशनगेट या मार्गावर पावलोपावली केवळ खड्डेच आणि रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहनेच पाहायला मिळतात. या खड्ड्यांतून मार्गक्रमण करणारा वाहनचालक यापुढे ‘पुन्हा हा रस्ता नको रे बाबा’ असे म्हणूनच पुढे जातो.
सिडको, हडकोतील रहिवासी हजारो नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी रोज आझाद चौक ते जुनाबाजार या रस्त्याचा वापर करतात. लोकमतने केलेल्या सर्वेमध्ये आझाद चौक ते जुनाबाजार या रस्त्यावर तब्बल ३४८ खड्डे असल्याचे आढळले. या रस्त्यावरील एक खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला की, दुसऱ्या खड्ड्यात तुमचे वाहन जाते. त्यामुळे या रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना पाठदुखीचा त्रास सुरू झालेला आहे.
खड्ड्यासोबतच या रस्त्यावरील दुभाजकावर अवैध रिक्षास्टॅण्ड सुरू करण्यात आले आहेत. या स्टॅण्डवर गुरुवारी दुपारी १ वाजता १५ रिक्षा रांगेत उभ्या होत्या. यासोबतच मालवाहू रिक्षा आणि चारचाकी वाहने या रस्त्यावर ठिकठिकाणी उभी केलेली आहेत. एवढेच नव्हे तर रोशनगेटजवळ तर हा रस्ता एकेरीच करण्यात आलेला आहे. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागते.
एमजीएम ते बजरंग चौक रस्त्यावर ८०७ खड्डे
सिडकोतील एमजीएम हॉस्पिटल ते बजरंग चौकापर्यंतच्या दुहेरी रस्त्यावर लहान-मोठे ८०७ खड्डे असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.
एमजीएम हॉस्पिटलसमोरील चौकात नाल्यावर लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. याच जाळीच्या बाजूला खड्डे पडले आहेत. जाळीवरून वाहन जात असताना याच खड्ड्यामध्ये चाक आदळते. यानंतर एमजीएम हॉस्पिटलच्या मार्गावर मधोमध लहान-लहान खड्ड्यांची रांगच तयार झाली आहे. पुढे रामा हॉटेलच्या पाठीमागील गेटच्या समोरील बाजूस कॉर्नरवर एकाच ठिकाणी १४ लहान-मोठे खड्डे पडल्याने येथून जाताना वाहने आदळतच जातात. वाय. एस. खेडकर हॉस्पिटलच्या समोरील बाजूस तर चार मोठ्या आकारातील खड्डे तर अपघाताला आमंत्रणच देत आहेत. या खड्ड्यांमधील मोठी खडी वर आल्याने येथे वाहने घसरून दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. चिश्तिया पोलीस चौकीसमोरील खड्डे, आविष्कार चौकातील स्पीड ब्रेकरच्या आजूबाजूला पडलेले लहान- मोठे खड्डे आहेत. तेथून बजरंग चौकापर्यंत खड्ड्यांची रांगच निर्माण झाली आहे. या संपूर्ण रस्त्यावर ३२६ खड्डे आढळून आले. बजरंग चौकाकडून एमजीएमकडे येणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याची अवस्था यापेक्षा वाईट आहे. राजीव गांधी क्रीडांगणासमोरील रस्त्यावर मधोमध लहान-लहान खड्ड्यांची सरळ रांगच निर्माण झाली आहे. येथून वाहने आदळत-आदळतच पुढे जातात. रामा हॉटेलच्या पाठीमागील गेटच्या कॉर्नरवर यापूर्वी असंख्य खड्डे होते. तेथे उन्हाळ्यात सिमेंट टाकण्यात आले, पण पावसाने सिमेंट वाहून तेथे मोठे जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. काही खड्डे तर १० ते १५ इंच खोल आहेत. बजरंग चौक ते एमजीएमपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर ४८१ लहान-मोठे खड्डे आढळून आले. या रस्त्यावर दोन्ही बाजूंना एकूण ८०७ खड्डे निर्माण झाले असून, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.
मोंढानाका उड्डाणपूल ते मध्यवर्ती बसस्थानक चौक
मोंढानाका उड्डाणपूल-सम्राट अशोक चौक-सिल्लेखाना चौक-स्वातंत्र्यवीर सावरकर चौक-मध्यवर्ती बसस्थानक चौक या रस्त्याचीही पार दुरवस्था झालेली आहे. या मार्गावरून जाताना तब्बल १०४ तर येताना ५६ खड्डे आहेत.
मोंढा, पैठणगेट, मध्यवर्ती बसस्थानक इ. भागांत ये-जा करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. दिवसभर या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र, गेल्या काही दिवसांनी या मार्गावरील खड्ड्यांनी वाहनधारक हैराण होत आहेत. मोंढा नाका उड्डाणपूल ते सिल्लेखाना चौकापर्यंत सर्वाधिक ५४ खड्डे आहेत. शिवाय ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर खडी पसरलेली दिसून येते. मध्यवर्ती बसस्थानक चौक तर अक्षरश: खड्ड्यांनी वेढला गेला आहे.
जालना रोड ते रमानगर, काल्डा कॉर्नर- संग्रामनगर रस्त्यावर खड्डे
जालना रोड ते रमानगर- काल्डा कॉर्नर- संग्रामनगर उड्डाणपूल रस्त्यावरील धोकादायक खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यावरील पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या रस्त्यावर रमानगर- काल्डा कॉर्नरवर सर्वात मोठा धोकादायक खड्डा आहे. त्यामुळे वाहनचालकांना गंभीर प्रसंगास सामोरे जावे लागू शकते.
पावसाचे तुंबलेले पाणी जालना रोडवरून संग्रामनगर पूल, काल्डा कॉर्नर व इतर भागांत जाणाऱ्या दुचाकीस्वारांना दिसत नाही. त्यामुळे वाहने त्यात आदळून अपघातास कारणीभूत ठरत आहेत. याच ठिकाणी चारचाकी वाहनेदेखील खड्ड्यात अडकल्याचे प्रकार समोर आले आहेत. दुचाकीस्वार तर पावसाच्या पाण्यात खड्ड्याचा अंदाज न आल्याने अडचणीत येत आहेत. शहानूरमियॉ दर्गा, संग्रामनगर पुलाकडे जाताना चौकातील मोठ्या खड्ड्यात वाहन आदळल्यास नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा येथे वाहने बंद पडत असल्याच्या तक्रारी असतानाही मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
पाच धोकादायक खड्डे
एक नव्हे तर किमान पाच मोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. त्याकडे मनपाच्या अधिकाऱ्यांंनी दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, तसेच दवाखाने देखील असून, सातारा परिसरात जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. वाहनात रुग्ण असेल तर त्यास मरणयातना सहन कराव्या लागतात.
सूतगिरणी रस्त्यावर ३ फूट लांबीचे खड्डे...
बऱ्याच महिन्यांपासून सेव्हन हिल ते सूतगिरणी चौक रस्त्याच्या व्हाईट टॅपिंगचे काम सुरू आहे. आतापर्यंत अर्ध्या भागात व्हाईट टॅपिंगच्या रस्त्याचे काम झाले आहे. परंतु ज्याठिकाणी रस्त्याचे काम होणे बाकी आहे त्याठिकाणी रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

४ दोन्ही बाजूने मिळून या रस्त्यावर तब्बल २९३ खड्डे आहेत. सेव्हन हिलकडून खाली उतरल्यावर कडा आॅफिसपासूनच या रस्त्याची दुरवस्था सुरू होते. गजानन मंदिर चौक, रिलायन्स मॉल याठिकाणी रस्ताच शिल्लक राहिलेला नाही.

४खोदकामामुळे दोन्ही ठिकाणी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे; परंतु पावसामुळे हा मुरूम बाजूला सरकल्यामुळे याठिकाणी दोन दोन फूट लांबीचे खड्डे पडले आहेत. पाऊस झालेल्या दिवशी खड्ड्यात पाणी साचल्यामुळे त्याचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालक यात पडून जखमी होत आहेत.
शहर
खड्ड्यात; महापालिकाच दोषी
शहरातील अर्धवट रस्त्यांच्या ठप्प झालेल्या कामांना आणि रस्ते खड्ड्यात जाण्याला महापालिकाच दोषी असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी गुरुवारी बैठकीत केला.

४ याकडे वारंवार ओरड करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे जीवघेणे अपघात घडत असल्याची तोफ सदस्यांनी डागली.

४ गुंठेवारी वसाहतींतील रस्त्यांवर दलदल झाली आहे. भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे रस्ते मधोमध खोदल्यामुळे व्हाईट टॅपिंगची कामे बंद पडली आहेत.

४नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकण्याची कामेही बंद आहेत. सभापती मोहन मेघावाले यांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा करून स्वेच्छा निधीची कामे सुरू करण्यात येतील, असे बैठकीत सांगितले.

४बैठकीत वारंवार चर्चा करूनही काही होत नसल्याचा आरोप करून शिवसेना सदस्य गजानन मनगटे यांनी सभागृह सोडले तर भाजप सदस्य नितीन चित्ते आणि राज वानखेडे, मनीषा मुंडे यांनी प्रशासन काम करीत नसल्याचा आरोप केला.
आम्ही गोट्या खेळण्यासाठी येतो काय?
गुंठेवारी वसाहतीतील चिखलमय झालेले रस्ते, नगरसेवकांच्या रखडलेल्या संचिका, आयुक्तांनी खर्चावर आणलेले निर्बंध आणि खड्ड्यात गेले शहर. या सर्व बाबींचा उद्रेक गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि स्वेच्छा निधीच्या रखडलेल्या कामांची परिस्थिती दीड वर्षांपासून जैसे थे आहे. बैठकीत चर्चा होण्यापलीकडे काहीही होत नाही. आम्ही काय येथे ‘गोट्या’ खेळण्यासाठी येतो काय? असा संतप्त सवाल करून सदस्यांनी बैठक गाजविली. वॉर्डनिहाय संचिका आणि निविदांची कामे अंतिम टप्प्यात असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
शहर अभियंता एस. डी. पानझडे म्हणाले, पेव्हिंग ब्लॉकने खड्डे बुजविण्यात येत आहेत. गुंठेवारी वसाहतींमध्ये मुरूम टाकणे हा पर्याय नाही. कारण मुरमामुळे पुन्हा चिखल होण्याची शक्यता असते. वसाहतींमध्ये काँक्रिट रोड करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करावी लागेल. ३ दिवसांत वॉर्डनिहाय अंदाजपत्रक निश्चित होणे शक्य नाही. किमान ७ दिवस लागतील.
सदस्यांची आगपाखड: सभापतींची अडचण
सदस्यांनी आगपाखड केल्यामुळे सभापती मेघावाले यांची अडचण झाल्याचे दिसून आले. गजानन मनगटे यांनी सभापतींवर संताप व्यक्त करीत सभागृह सोडले. राज वानखेडे यांनी सभापतींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. नितीन चित्ते यांनी विचारलेल्या प्रश्नावर सभागृहात खुलासाच झाला नाही. कैलास गायकवाड, रावण आम्ले यांनी जाफरगेट बाजारावर प्रश्न उपस्थित केले. मनीषा मुंडे म्हणाल्या, नागरिक नगरसेवकांना वाटेल ते बोलतात. काम होत नसेल तर सभागृहात येऊन काय करायचे. दीड वर्षांत कामे झालेली नाहीत.

Web Title: Tourism in the capital of the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.