दुष्काळी बैठकीसाठी जोरदार तयारी

By Admin | Updated: November 27, 2014 01:10 IST2014-11-27T01:05:07+5:302014-11-27T01:10:23+5:30

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.

Tough preparation for drought | दुष्काळी बैठकीसाठी जोरदार तयारी

दुष्काळी बैठकीसाठी जोरदार तयारी


औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या इतर मंत्री व अधिकाऱ्यांच्या सरबराईत कोणतीही कसर राहू नये यासाठी प्रशासनाने सर्व काळजी घेतली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय आणि सुभेदारी विश्रामगृहात साफसफाई, रंगरंगोटी आणि किरकोळ दुरुस्तीचे कामही करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या गुरुवारी दुष्काळी आढावा बैठकीसाठी औरंगाबादेत येत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी ३ वा. ते ही बैठक घेणार आहेत. त्यांच्यासोबत महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तसेच विविध खात्यांचे प्रधान सचिवही येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गेल्या आठ दिवसांपासून दौऱ्याची तयारी सुरू आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात रंगरंगोटी, साफसफाई करण्यात आली आहे. तसेच किरकोळ दुरस्तीही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुभेदारी विश्रामगृहाचादेखील कायापालट करण्यात आला आहे. विश्रामगृहात रंगरंगोटी आणि किरकोळ दुरुस्ती केली गेली आहे. तसेच मुख्यमंत्री येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम बुधवारी सकाळपासून सुरू आहे. मुख्यमंत्र्याच्या बैठकीला मंत्रालयातील अनेक अधिकारी येणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुभेदारीबरोबरच या अधिकाऱ्यांसाठी शहरातील विविध विभागांचे शासकीय विश्रामगृह बुक केले आहेत.
अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री याच ठिकाणी मराठवाड्यातील आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे विभागातील सर्व आमदारांना बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीसाठी आवश्यक टिप्पणी तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात दोन दिवसांपासून कृषी, जलसंपदा, महसूल, सहकार, मदत व पुनर्वसन, महावितरण, जिल्हा परिषद अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत.

Web Title: Tough preparation for drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.