छत्रपती संभाजीनगर : चित्ते पिंपळगावात आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्याने गहाण ठेवलेली जमीन सावकाराने स्वत:कडेच ठेवून घेतली. काही वर्षांनी ती परस्पर विकण्याचा घाट घालत शेतकऱ्याला ताबा सोडण्यासाठी छळ सुरू केला. छळाला कंटाळून प्रभाकर लालचंद चव्हाण (५०) यांनी त्याच जमिनीवर विष प्राशन करून आत्महत्या केली. रविवारी घडलेल्या घटनेनंतर सोमवारी सकाळी प्रभाकर यांचा मृत्यू झाला. बळीराम बबन रिठे व विष्णू दत्तू घोडके यांच्यावर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चव्हाण कुटुंबासह दोन क्रमाकांच्या तांड्यावर राहत होते. शेतीसह ते रोजंदारीवर कामावर जात. २००९ मध्ये आर्थिक संकटामुळे त्यांनी त्यांची ५ गुंठे जमीन गावातीलच घोडकेकडे गहाण ठेवत ३५ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर ते घोडकेला ३५ हजार रुपये परत करून जमीन परत देण्याची मागणी वारंवार करत. मात्र, घोडके नकार देत होता. कर्ज देताना घोडकेने सदर जमिनीची रजिस्ट्री करून घेतली होती. त्यानंतर ती जमीन परस्पर रिठेला विकली. त्यामुळे बबन रिठे, सुखदेव रिठे हे सतत चव्हाण यांच्या घरी जात सतत जमिनीचा ताबा देण्यासाठी दबाव टाकत.
जमिनीचा ताबा न देण्यावर ठाम३० ऑगस्ट रोजी घोडके व रिठे कुटुंबातील जवळपास ११ जणांनी घोडके यांच्या घरी जात धिंगाणा घातला. बळीराम रिठेने चव्हाण यांच्यासह त्यांची पत्नी, मुलाला मारहाण केली. रिठेने कुटुंबाला ७ लाख रुपये देऊन जमिनीचा ताबा देण्यासाठी धमकावले. मात्र, चव्हाण जमीन विकण्यास तयार नव्हते.
घाटीसह पोलिस ठाण्यात कुटुंब आक्रमकरविवारी दुपारी प्रभाकर शेतात गेले. तेथेच त्यांनी विष घेतले. ही बाब लक्षात येताच कुटुंबाने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चव्हाण कुटुंब आक्रमक झाले. आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन न करण्याची भूमिका घेत पोलिस ठाण्यासह घाटी रुग्णालयात ठिय्या दिला. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन पार पडले. त्यानंतर रात्री रिठे व घोडकेवर गुन्हा दाखल करण्यात आला.