तूर डाळीचे कट्टे रेशन दुकानांवरच पडून!
By Admin | Updated: September 7, 2016 00:38 IST2016-09-07T00:12:12+5:302016-09-07T00:38:34+5:30
औरंगाबाद : व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा भाव कमी केल्यामुळे त्याचा फटका रेशनवरील तूर डाळीस बसत असून या डाळीला उठावच नाही.

तूर डाळीचे कट्टे रेशन दुकानांवरच पडून!
औरंगाबाद : व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा भाव कमी केल्यामुळे त्याचा फटका रेशनवरील तूर डाळीस बसत असून या डाळीला उठावच नाही. त्यामुळे रेशन दुकानावर तूर डाळीचे कट्टे जसेच्या तसे पडून आहेत.
रेशन दुकानावर तूर डाळ उपलब्ध करून देताच व्यापाऱ्यांनी ८० ते १०० रु. प्रतिकिलो दराने विक्री सुरूकेली. त्यामुळे रेशनवरील १०३ रु. किलो दराने मिळणारी डाळ खरेदी करण्यास रेशन कार्डधारक तयार नाहीत. तूर डाळीचे भाव नियंत्रणात येत नसल्यामुळे सरकारने खुल्या बाजारात सुरुवातीला १२० रु. किलो दराने ही डाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. सरकार बाजारात तूर डाळ आणणार असल्याचे समजताच व्यापाऱ्यांनी त्यांचा नफा कमी केला. हळूहळू तूर डाळीचे भाव नियंत्रणात येताच सरकारनेही १२० रुपयांऐवजी ९५ रु. किलो दराने मॉलमध्ये तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. तसेच रेशन दुकानातून बीपीएल आणि अंत्योदय लाभार्र्थींसाठी तूर डाळ देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र बाजारात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या तूर डाळीपेक्षा जास्त भावाने म्हणजे १०३ रुपये प्रतिकिलो असा भाव ठेवला. मॉलमध्ये स्वस्त आणि रेशन दुकानावर महाग अशी चर्चा सुरूझाली. रेशन दुकानदारांनीही सावध भूमिका घेत १-२ क्विंटल एवढीच तूर डाळ उचलली आणि आता तर ही डाळ रेशन दुकानांवरच पडून आहे. दुकानापर्यंत डाळ आणण्यासाठी प्रतिक्विंटल २५ रु. ट्रान्सपोर्ट जास्तीचा करावा लागतो. रेशनकार्डधारकांकडून डाळीला मागणी नसल्याने आठवडाभरापासून ती दुकानांतच पडून आहे. डाळ जुनी झाली की, त्यातील ओलसरपणा कमी होऊन ती वाळेल. म्हणजे वजन कमी होईल. सरकारला डाळ परत करताना प्रतिक्विंटलमागे मोठी घट होईल. त्याचा भुर्दंडही वेगळा पडेल, यामुळे रेशन दुकानदारही धास्तावलेले आहेत.