शहरात फडकणार सर्वात उंच तिरंगा

By Admin | Updated: October 5, 2014 00:50 IST2014-10-05T00:12:41+5:302014-10-05T00:50:40+5:30

औरंगाबाद : या शहराने राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम स्थापन करून आपले नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंदविले.

Top Tricolor | शहरात फडकणार सर्वात उंच तिरंगा

शहरात फडकणार सर्वात उंच तिरंगा

औरंगाबाद : सुमारे अडीच वर्षांपूर्वी आपल्या राष्ट्रगीताला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या शहराने राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम स्थापन करून आपले नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंदविले. हा विश्वविक्रम स्थापन करून शहरातील नागरिकांनी आपले नाव या देशात आणि जगात उंचावले. देशप्रेमाची ही प्रचीती पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. आता आपल्या शहरात सर्वात उंच तिरंगा फडकाविण्याचा निर्धार राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय प्रतीके ही कोणत्याही देशातील नागरिकांचा अभिमानच असतो. राष्ट्राभिमान जागविण्याचे काम ही प्रतीके करीत असतात. २५ जानेवारी २०१२ रोजी अगदी पहाटेच लाखो पावले गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलाच्या दिशेने चाललेली दिसली. संपूर्ण शहरातून नागरिक शिस्तबद्ध रीतीने क्रीडा संकुलाकडे येत होते. दुचाकी, चारचाकी वाहनाने तसेच पायी लोक येत होते. जणू काही सैन्य युद्धावर निघाले आहे, असे ते दृश्य होते. शिस्तबद्ध रीतीने आणि प्रचंड उत्साही वातावरणात आपण राष्ट्रगानाचा जागतिक विक्रम केला. अगदी पहाटेपासूनच ‘जन गण मन’ गाण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. याआधी सर्वाधिक संख्येने राष्ट्रगीत गायनाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. हा विक्रम कोणत्याही परिस्थितीत मोडायचाच, असा निर्धार शहरातील नागरिकांनी आधीच केला होता. त्यामुळे २५ जानेवारी २०१२ रोजी एक अभूतपूर्व असा जनसमुदाय क्रीडा संकुलात जमा झाला. सर्व वातावरण देशभक्तीने प्रफुल्लित झाले होते. प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि शंकर महादेवन यांच्या देशभक्तीपर गाण्यांनी या वातावरणात आणखी चैतन्य निर्माण केले. राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम होऊन त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याचे जेव्हा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले त्यावेळी अख्खे क्रीडा संकुल जल्लोषात न्हाऊन गेले. ‘राष्ट्रगान-राष्ट्र अभिमान’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले हे अभियान म्हणजे औरंगाबादच्या आधुनिक इतिहासातील एक सोनेरी पानच ठरले. जगात अनेक देशांत त्या- त्या देशाचे राष्ट्रध्वज उंचच उंच फडकत आहेत. देशाभिमान आणि देशप्रेमाचे ते प्रतीक मानले जाते. आपला तिरंगा तर सर्वांना ‘जान से प्यारा’ असाच आहे. झंडा ऊंचा रहे हमारा... देशाचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा सर्वात उंचावर फडकविण्याचे अभियान राबविण्याचा निर्धार राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रगीत गायनाच्या विश्वविक्रमातही त्यांचे मोठे योगदान राहिले. शहरातील नागरिकांनी अडीच वर्षांपूर्वी दाखविलेल्या देशप्रेमामुळे सर्वच जण भारावून गेले. हीच प्रेरणा आणि उत्साहामुळे आता सर्वात उंच तिरंगा फडकविण्याचे अभियान सुरू करण्यात येणार आहे. शहरात सर्वात उंच असा राष्ट्रध्वज फडकविण्याच्या ठिकाणी एक उद्यानही विकसित होईल. शिवाय ‘फ्लॅग म्युझियम’ उभारण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जातील. देशप्रेमाचा हा संकल्प पूर्ण करण्यात येईल. देशाचा तिरंगाही असाच डौलाने उंचावर फडकावा, या निर्धाराने ‘झंडा ऊंचा रहे हमारा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे देशप्रेमाचा आदर्श शहरवासीय घालून देणार आहेत. प्रत्येकाला अभिमानच वाटेल देशप्रेमाची ऊर्मी काय असते ते या शहराने ‘राष्ट्रगीत गायन’ अभियानात दाखवून दिले आहे. शहरात सर्वात उंच तिरंगा फडकविण्याचे जे अभियान सुरू होणार आहे, त्यामुळे या शहराची मान आणखी उंचावली जाणार आहे. मला खात्री आहे की, या शहरातील प्रत्येक नागरिक या अभियानात आपले योगदान देईल. सर्वात उंच तिरंगा फडकविण्याचे ठिकाण, तिथला परिसर आणि उंच तिरंगा पाहून प्रत्येक नागरिकाला आपल्या शहराचा आणि त्या ठिकाणचा गौरवच वाटेल. अर्थात, हे होणार आहे ते केवळ या शहरातील नागरिकांमुळेच. -राजेंद्र दर्डा

Web Title: Top Tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.