‘टूल टेक’ प्रदर्शन मार्च महिन्यात
By Admin | Updated: January 11, 2016 00:07 IST2016-01-10T23:59:38+5:302016-01-11T00:07:20+5:30
औरंगाबाद : मराठवाडा ‘टूल टेक एक्सपो’ हे प्रदर्शन येत्या ३ व ४ मार्च रोजी भरविण्यात येणार आहे. वाळूज येथील मराठवाडा आॅटो क्लस्टरमध्ये होणारे हे

‘टूल टेक’ प्रदर्शन मार्च महिन्यात
औरंगाबाद : मराठवाडा ‘टूल टेक एक्सपो’ हे प्रदर्शन येत्या ३ व ४ मार्च रोजी भरविण्यात येणार आहे. वाळूज येथील मराठवाडा आॅटो क्लस्टरमध्ये होणारे हे प्रदर्शन उद्योजकांबरोबरच विद्यार्थी, कुशल कामगार व अभियंत्यांसाठी पर्वणीच ठरेल, असा विश्वास आयोजकांनी रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए), मराठवाडा आॅटो क्लस्टर आणि ‘आयसा’ यांच्या वतीने हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. मराठवाड्यातील उद्योगांशी पूरक असणारे हे प्रदर्शन मेटल कटिंग टूल्स, टूलिंग सिस्टीम, टूल डिझाईन सॉफ्टवेअर आणि मेट्रॉलॉजी उत्पादनांवर केंद्रित असेल. या क्षेत्रात अलीकडे झालेले बदल व अद्ययावत प्रगती याविषयी मराठवाड्यातील उद्योगांना माहिती व्हावी, संबंधित उद्योगांना आपल्या उत्पादनांत सुधारणा करता यावी, या हेतूने प्रदर्शन भरविले जाणार असल्याचे ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी सांगितले.
‘टूल टेक’ क्षेत्रातील प्रदर्शने मुंबई, बंगळूर, दिल्लीसारख्या शहरात भरविली जातात. उद्योग समूहातील उच्च पदस्थांनाच अशा प्रदर्शनांना भेटी देण्याची संधी मिळते. अभियंते, कुशल कामगार, लघु उद्योजक, विद्यार्थी यासारखा वर्ग त्यापासून वंचित राहतो. या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याचे भरत गंगाखेडकर यांनी सांगितले. विवेक भोसले, लोणीकर, अनिल कोरडे, समीर कानडखेडकर यावेळी उपस्थित होते.