टोमॅटो कवडीमोल; काढणीचा खर्चही निघेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 23:47 IST2017-01-01T23:46:38+5:302017-01-01T23:47:52+5:30
ल्ाातूर : रात्रीचा दिवस करून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना पीक बहरात आले की, आकाश ठेंगणे होऊन जाते.

टोमॅटो कवडीमोल; काढणीचा खर्चही निघेना
ल्ाातूर : रात्रीचा दिवस करून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना पीक बहरात आले की, आकाश ठेंगणे होऊन जाते. भरघोस उत्पादन निघण्याची शाश्वती झाल्याने दर्जेदार उत्पादनावर अधिक खर्च करण्याची शेती व्यवसायातील परंपरा. यावर्षी टोमॅटोचे पीक चांगले आले. पण बाजारात मागणीच नसल्याने काढणीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. लातूर जिल्ह्यातून परराज्यात दररोज १०० टन टोमॅटो जात असून, स्थानिक बाजारात १० ते १५ टन किरकोळ विक्री होत आहे. शेतकऱ्यांना ३० किलोच्या कॅरेटला ८० ते १०० रुपये भाव मिळत असल्याने बांधावरच निराशा होत आहे.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वडवळ जानवळ, वडवळ नागनाथ, नळेगाव, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव, भादा, भेटा आदी ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जाते. वडवळ जानवळ व औराद शहाजानी येथे अनेक शेतकरी वर्षानुवर्षे टोमॅटोचे उत्पादन घेतात. यावर्षी चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना हमी असताना दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. परिणामी, मुंबई, दिल्ली, कोलकाता व स्थानिक व्यापाऱ्यांकडून टोमॅटोला मागणी नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिकलेले टोमॅटो बांधावरून बाहेर काढण्यासाठी लागणारा खर्चही विक्रीतून मिळत नाही. बाजारात पोहोचविण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च अंगलट येत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. दिल्ली व मुंबईच्या बाजारात दररोज जवळपास १०० टन टोमॅटो जात आहे. तर लातूरच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये दहा ते पंधरा टन टोमॅटो येत आहे. कमी क्षेत्र असलेले काही शेतकरी व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा स्वत: किरकोळ विक्री करीत असून, दहा रुपयात तीन ते चार किलो टोमॅटोची विक्री होत आहे.