नाव्हा येथील शौचालय अनुदानाचा धनादेश न वटता आला परत
By Admin | Updated: May 23, 2015 00:38 IST2015-05-23T00:22:50+5:302015-05-23T00:38:16+5:30
जालना: निर्मल भारत अभियानातंर्गत बांधलेल्या शौचालयाचे अनुदान मागील वर्षभरापासून देण्यात आले नाही

नाव्हा येथील शौचालय अनुदानाचा धनादेश न वटता आला परत
जालना: निर्मल भारत अभियानातंर्गत बांधलेल्या शौचालयाचे अनुदान मागील वर्षभरापासून देण्यात आले नाही. तसेच अनुदानापोटी देण्यात आलेला केवळ ४ हजार ६०० रूपयांचा धनादेशही न वटता परत आल्याने लाभार्थ्याला अनुदानासाठी मागील वर्षभरापासून जालना पंचायत समितीचे खेटे मारावे लागत आहे. मात्र पं.स.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले.
जालना तालुक्यातील नाव्हा येथील राजहंसाबाई दत्तात्रय इंगळे व दत्तात्रय इंगळे या वृद्ध दांम्पत्यांनी वर्षभरापूर्वी निर्मल भारत अभियान कार्यक्रमातंर्गत शौचालय बांधले. सर्व कागदपत्राची पूर्तता करून ही त्यांना या बांधलेल्या शौचालयाचे अनुदान मिळाले नाही. सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर त्यांना २४ जुलै २०१४ रोजी ४६०० रूपयांचा धनादेश (क्र. ०४६८३२) ग्रामपंचायतने दिला. मात्र ग्रामपंचायतच्या खात्यात पैसेच नसल्याने तो धनादेश न वटताच परत आला. तेव्हा पासून इंगळे हे अनुदानाच्या धनादेशासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयात खेटे मारत आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांना अनुदान मिळालेले नाही. (प्रतिनिधी)