अनुदान उचलूनही शौचालय बांधले नाही
By Admin | Updated: January 25, 2017 23:59 IST2017-01-25T23:56:53+5:302017-01-25T23:59:37+5:30
लातूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लातूर शहरातील ५ हजार ७०६ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर झाले

अनुदान उचलूनही शौचालय बांधले नाही
लातूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लातूर शहरातील ५ हजार ७०६ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर झाले असून यातील २ हजार ६८९ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर २०१० लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू आहे. परंतु, १००७ लाभार्थ्यांनी अद्याप बांधकामाला प्रारंभ केला नाही. अनुदान उचलूनही बांधकाम सुरू न केल्याने या लाभार्थ्यांना मनपाने नोटिसा पाठविल्या असून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तंबी देण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत लातूर मनपाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून गुड मॉर्निंग पथक शहरात कार्यान्वित करण्यात आले आहे. ज्या भागातील नागरिक उघड्यावर शौचास जातात, त्या भागात गुड मॉर्निंग पथकाचा सकाळच्या प्रहरी ठिय्या आहे. मंगळवारी दीपज्योतीनगर भागात १५ नागरिकांना उघड्यावर शौचास बसल्याने त्यांना पकडून पोलीस ठाण्यात दिवसभर ठेवण्यात आले. त्यांच्याकडून हमीपत्र घेतल्यानंतर सोडून देण्यात आले.
दरम्यान, बुधवारी नांदगाव वेस परिसरात गुड मॉर्निंग पथकाचा ठिय्या होता. मनपाचा दवाखाना असलेल्या पटेल चौक परिसरात उघड्यावर शौचास बसतात. मात्र बुधवारी सकाळी या पथकाने एकालाही उघड्यावर शौचास बसू दिले नाही. या भागातील ज्यांनी वैयक्तिक शौचालय बांधकामाचे अनुदान उचलले आहे, त्या सर्वांना नोटिसा देण्यात आल्या. शिवाय, त्यांच्याकडून तत्काळ बांधकाम करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले असून, मनपाने बुधवारी दिवसभरात १००७ लाभार्थ्यांना नोटिसा बजावल्या.
बांधकाम पूर्ण न केल्यास गुन्हे दाखल करण्याची तंबीही यावेळी देण्यात आली.