विहिरीत पडलेला कोल्हा तीन दिवसानंतर बाहेर
By Admin | Updated: April 7, 2015 01:21 IST2015-04-07T00:52:08+5:302015-04-07T01:21:49+5:30
तामलवाडी : पाण्यासाठी भटकंती करणारा कोल्हा सुरतगाव (ता़तुळजापूर) शिवारातील विहिरीत पडल्याने तीन दिवस अन्न-पाण्यावाचून तडफडत होता़

विहिरीत पडलेला कोल्हा तीन दिवसानंतर बाहेर
तामलवाडी : पाण्यासाठी भटकंती करणारा कोल्हा सुरतगाव (ता़तुळजापूर) शिवारातील विहिरीत पडल्याने तीन दिवस अन्न-पाण्यावाचून तडफडत होता़ वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सोमवारी वनरक्षकांनी दीड तासाच्या प्रयत्नानंतर त्या कोल्ह्यास विहिरीतून त्याला बाहेर काढले़
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतगाव शिवारात विश्वनाथ नामदेव गुंड यांची शेती आहे़ गुंड यांच्या शेतातील ७० फूट खोल विहिरीत पाण्यासाठी भटकंती करणारा कोल्हा पडला होता़ ही बाब सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली़ हा कोल्हा शनिवारी या विहिरीत पडल्याचा कायास शेतकऱ्यांनी व्यक्त केला़ या घटनेची माहिती सूरतगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अण्णा गुंड, माजी सरपंच राम गुंड, उपसरपंच तानाजी गुंड यांना दिली़ त्यांनी तत्काळ विहिरीवर जावून पाहिले असता एक वन्यप्राणी विहिरीत अडकून पडल्याचे दिसून आले़ आतमध्ये पडलेला प्राणी लांडगा आहे की कोल्हा याचा अंदाज येत नव्हता़ उपस्थितांनी तत्काळ याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी़एचक़ोळगे यांना दिली़ कोळगे यांनी वनरक्षक, मजूर यांना माहिती देवून घटनास्थळाकडे पाठवून दिले़ वन मजूर कुमार गोरे, घोरपडे, गुणवंत शित्रे, वसंत जमदाडे, नारायण पवार, देविदास महाडीक, गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यावेळी देविदास महाडीक, कुमार गोरे हे पायऱ्या नसलेल्या ७० फूट खोल विहिरीत दोरीच्या सहाय्याने उतरले़ जवळपास दीड तासाच्या प्रयत्नानंतर आतील कोल्ह्याला पोत्यामध्ये घालून दोरीच्या सहाय्याने शेंदून वर काढण्यात आले़
कोल्ह्यास वर काढल्यानंतर कोल्ह्याची तपासणी करण्यात आली़ त्यावेळी त्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे दिसून आले़ वन विभागाने तीन दिवस विहिरीत अन्न-पाण्यावाचून पडलेल्या कोल्ह्याचे शर्तीचे प्रयत्न करून प्राण वाचविल्याने त्यांचे कौतुक होत आहे़ (वार्ताहर)