अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
By Admin | Updated: October 1, 2014 00:40 IST2014-10-01T00:40:11+5:302014-10-01T00:40:11+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्र परत घेण्याची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजता संपत आहे.

अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्र परत घेण्याची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजता संपत आहे. मुदतीआधीच बंडखोरांना बसविण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीसाठी नऊही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले असले तरी अखेरच्या मुदतीनंतर रिंगणात कोण राहते आणि कोण माघार घेते हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी २७ सप्टेबरपर्यंत इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत ३१९ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत त्यापैकी ३६ जणांचे अर्ज बाद ठरले. त्यामुळे आता २८३ जणांचे अर्ज उरले आहेत. एकेका मतदारसंघात कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ५० उमेदवार उरले आहेत.
उमेदवारांच्या या गर्दीमुळे मत विभाजनाचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रमुख उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे उद्या अनेक जण माघार घेण्याची शक्यता आहे. परिणामी उद्या बुधवारी दुपारी ३ वाजेनंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
चिन्ह वाटप
माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने नुकतीच चिन्हांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार प्रमुख राजकीय पक्षांसाठी ८ चिन्ह राखीव ठेवण्यात आले आहेत. तर अपक्षांसाठी ८५ मुक्त चिन्हांचा पर्याय उपलब्ध असणार आहे.