पैठण, गंगापूर येथे आज नगराध्यक्षपदाची निवडणूक
By Admin | Updated: July 17, 2014 01:36 IST2014-07-17T01:28:28+5:302014-07-17T01:36:11+5:30
पैठण/गंगापूर : पैठण व गंगापूरच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी १७ जुलै रोजी निवडणूक होत आहे.

पैठण, गंगापूर येथे आज नगराध्यक्षपदाची निवडणूक
पैठण/गंगापूर : पैठण व गंगापूरच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी १७ जुलै रोजी निवडणूक होत आहे. तसेच कन्नड व वैजापुरात नगराध्यक्षांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने तेथे गुरुवारी फक्त उपनगराध्यक्षांची निवड होईल.
पैठणमध्ये तीन जण रिंगणात आहेत. दोन शिवसेनेचे, तर एक काँग्रेसचा उमेदवार अशी तिहेरी लढत आहे, २० चे संख्याबळ असलेल्या न.प.त ४ नगरसेवक शहरात असून, उर्वरित सर्व नगरसेवक भूमिगत झाले असल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
पैठण नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे जितसिंग करकोटक, शिवेसेचे दत्ता गोर्डे व शिवसेनेच्या राखी परदेशी यांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत. गुरुवारी दुपारी ३ वाजता पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली न.प.च्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन होणार आहे. नगर परिषदेत २० संख्याबळ असून, यात काँग्रेस-११, राष्ट्रवादी काँग्रेस-१, शिवसेना-४, भाजपा-२, शहर विकास आघाडी-२ असे सदस्य आहेत.
पैठणमध्ये काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी यंदा मुस्लिम नगरसेवकाला संधी द्या, अशी मागणी लोकसभेच्या निवडणुकीपासून लावून धरली होती. दरम्यान, पक्षाने पुन्हा जितसिंग करकोटक यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्यातील असंतोष उफाळून आला व ते एक एक करीत शहरातून भूमिगत झाले.
काँग्रेसने व्हिप बजावला
काँग्रेस पक्षाने पैठण नगराध्यक्षपदासाठी जितसिंग करकोटक व उपनगराध्यक्ष पदासाठी शेहनाज टेकडी यांना उमेदवारी घोषित करून काँग्रेसच्या या दोन्ही उमेदवारांना मतदान करावे म्हणून व्हिप काढला आहे. काँग्रेसचे जवळपास ७ सदस्य भूमिगत झाले असल्याने व्हिप त्यांच्या घरी जाऊन बजावण्यात आला आहे. काँग्रेसचे नगरसेवक आझिम कट्यारे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचा दावा केला असून, यात आझिम कट्यारे, कमलाबाई श्यामसुंदर लोहिया, शिल्पा सतीश पल्लोड, शेख अब्बास शेख कासम, इनामोद्दीन फसियोद्दीन अन्सारी व राजू सर्जेराव गायकवाड यांचा समावेश असल्याचे सांगितले. कट्यारे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगत आम्ही पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले.
शिवसेनेचा उमेदवार कोण?
पैठण नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून दत्ता गोर्डे व राखी परदेशी या दोन नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली आहे. राखी परदेशी यांना पक्षाचे सूचक, अनुमोदक मिळू न शकल्याने त्यांनी काँग्रेसचे सोमनाथ भारतवाले व सुधाकर तुपे यांच्या स्वाक्षऱ्या घेत सूचक, अनुमोदक केले आहे, तर दत्ता गोर्डे यांना शिवसेना-भाजपाचे सूचक व अनुमोदक आहेत. शिवसेनेचा उमेदवार कोण, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात शिवसेनेच्या वरिष्ठांनी उमेदवार कोण, याबाबत गुळणी धरून बसल्याने संभ्रम वाढला आहे.
एक नगरसेवक विदेशात
शहर विकास आघाडीचे प्रभाग दोनचे नगरसेवक सुभाष पटेल हे सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते उद्या होणाऱ्या मतदानासाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी कळविले आहे.