महापौर, उपमहापौरांची आज निवड
By Admin | Updated: May 22, 2017 00:04 IST2017-05-22T00:04:10+5:302017-05-22T00:04:50+5:30
लातूर : लातूर मनपाच्या महापौर व उपमहापौरांची निवड सोमवारी होणार आहे.

महापौर, उपमहापौरांची आज निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लातूर मनपाच्या महापौर व उपमहापौरांची निवड सोमवारी होणार असून, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडीची प्रक्रिया होणार आहे. मनपात भाजपाचे ३६ आणि काँग्रेसचे ३३ नगरसेवक आहेत. काठावर बहुमत असलेल्या भाजपाने दगाफटका होऊ नये म्हणून आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठविले आहे. काँग्रेसने घोडेबाजार करणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी भाजपाने नगरसेवकांना सहलीवर पाठवून खबरदारी घेतली आहे. शिवाय, महापौर व उपमहापौर पदांच्या उमेदवारीबाबतही संभ्रम ठेवून चौघा जणांचे अर्ज भाजपाने भरले आहेत. काँग्रेसने मात्र महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एकाचा अर्ज दाखल केला आहे.
महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीने शोभा पाटील, सुरेश पवार, देविदास काळे, शैलेश गोजमगुंडे या चौघांचेही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय, उपमहापौर पदासाठीही याच चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ऐनवेळी यातील दोघांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले जाणार आहे. महापौर पदासाठी शोभा पाटील तर उपमहापौर पदासाठी देविदास काळे यांचा अर्ज राहील, अशी शक्यता आहे.
बाकीच्या दोघांना दोन्हीही पदासाठी दाखल केलेले अर्ज मागे घ्यायला सांगितले जाईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. इकडे काँग्रेसने महापौर पदासाठी विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर पदासाठी युनुस मोमीन यांचा अर्ज दाखल केला आहे. भाजपाने मात्र महापौर, उपमहापौर पदासाठी चौघा जणांचे उमेदवारी अर्ज भरून दोन्हीही पदांच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम कायम ठेवला आहे. निवडीच्या एक तास अगोदर महापौर पदाचा व उपमहापौर पदाचा उमेदवार निश्चित होणार आहे. त्यादृष्टीने भाजपाने व्हीप जारी केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.