जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड
By Admin | Updated: May 22, 2015 00:33 IST2015-05-22T00:21:37+5:302015-05-22T00:33:48+5:30
लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. बँकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया होणार आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड
लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. बँकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या अर्जांची स्वीकृती व छाननीसाठी १५ मिनिटांचा वेळ आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर अंतिम उमेदवारांत मतदान होईल. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे १९ पैकी १८ उमेदवार निवडून आले आहेत. रमेश कराड भाजपाचे एकमेव संचालक आहेत. त्यामुळे बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. संचालक मंडळात एकूण ११ जुने चेहरे आहेत. जुन्यांना संधी मिळते की, नव्या संचालकांची वर्णी लागते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात या संचालकांतून नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार आहे. बरोबर सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी ए.एच. घोलकर इच्छुकांचे अर्ज स्वीकारतील. अर्ज दिल्यानंतर १५ मिनिटांचा वेळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील १५ मिनिटांत प्राप्त अर्जांची छाननी होईल. वैध अर्जांतून अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला प्रारंभ होईल. दुपारी १२.३० वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए.एच. घोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. परंतु, नेमकी कोणाची या पदांवर वर्णी लागते, हे शुक्रवारी सकाळी ११ वाजताच कळणार आहे.