परळीमध्ये आज नेतृत्वाचा कस
By Admin | Updated: May 13, 2017 21:44 IST2017-05-13T21:43:34+5:302017-05-13T21:44:51+5:30
परळी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी ८ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

परळीमध्ये आज नेतृत्वाचा कस
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी ८ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या बहीण- भावाच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. बाजार समिती आपल्याकडे खेचण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. मागील पंधरा दिवसांपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. भाजप व काँग्रेस- राकॉ आघाडीतर्फे शनिवारी शहरातील मोंढा भागातून प्रचार फेरी काढण्यात आली. काँग्रेस- राकॉ च्या प्रचारफेरीचे नेतृत्व धनंजय मुंडे यांनी केले तर भाजपच्या प्रचार फेरीत खा. डॉ. प्रीतम मुंडे उतरल्या होत्या.
भाजपने लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकरी विकास पॅनल व राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस आघाडीने स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनल स्थापन करुन स्वतंत्र उमेदवार आखाड्यात उतरविले आहेत. १८ जागेसाठी ४२ उमेदवार नशीब आजमावत असले तरी या दोन पॅनलमध्येच समोरासमोर सामना रंगणार आहे.
निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सोमवारी मतमोजणी
सोमवारी सकाळी ९ वाजता परळीतील जिल्हा परिषद कन्याशाळेमध्ये मतमोेजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येतील. कृउबावर कोणाचा झेंडा फडकतो? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.